आजन्म टिकावं नातं

* ओ. डी. सिंह

पतीपत्नी एकमेकांसोबत गोड क्षणांचं सुख तर अनुभवतातच, पण कडवटपणादेखील एखाद्या आव्हानासारखा त्यांना एकमेकांसोबत मैत्रीपूर्ण वातावरणात राहण्याची प्रेरणा देतो. विवाहपद्धतीविना हे जग एक तमाशा बनून राहिलं असतं. मात्र विवाहाने स्त्री पुरुषाच्या संबंधांना समाजात एक स्थायी स्थान दिलं आहे. पाश्चिमात्य देशात आधी ओळख मग प्रेम आणि मग लग्न होत असे, पण आपल्याकडे आधी लग्न आणि मग प्रेम व्हायचं. उत्तर भारतात अजूनही दोन अनोळखी कुटुंबांमध्ये मुलामुलींचं लग्न जुळतं. मात्र अलीकडे होणाऱ्या बुहतांश लग्नांमध्ये मुलंमुली एकमेकांना आधीपासूनच ओळखू लागतात. आपापसांत प्रेम होतं की नाही हे जरूरी नाही, प्रेमविवाहांना प्राधान्यही दिलं जाऊ लागलं आहे.

नातं टिकावं आनंदाने

लग्न कोणाचंही असो, कुठेही असो, एक गोष्ट तर नक्की आहे की मुलामुलीने एकमेकांना ओळखणं फार गरजेचं आहे. कारण आपलं आयुष्य प्रेमाने एकत्र आणि दिर्घ काळ टिकवायचं असतं. आयुष्यात आनंद काही बाहेरून येत नाही. दोघांनी मिळून मिसळून एकमेकांच्या भावनेची कदर करीत सर्व कामं पूर्ण करायची असतात शिवाय हे तेव्हाच शक्य आहे, जेव्हा ही दोघांची इच्छा असेल. घरातील कोणत्याही कामाची जबाबदारी कोणा एकाची नसते. ही गोष्ट वेगळी आहे की सवलतीसाठी आपण काही कामं वाटून घ्यावीत. काळानुरूप बदल घडू लागला आहे आणि आनंदाची गोष्ट म्हणजे पती ही गोष्ट समजू लागले आहेत.

भांडणाचं कारण

मतभेदाच्या कारणांवर जर नजर टाकली तर असं दिसून येईल की अनेक प्रकरणांमध्ये एक तर एकमेकांच्या कुटुंबांवरून भांडणं होतात किंवा पती पत्नीच्या आयुष्यात कोणी दुसरी वा दुसरा येतं. लग्नानंतर पत्नीला आडनाव तर पतीचंच लावावं लागतं. मात्र आता काही पत्नी माहरेचं आडनावही रिटेन करतात. अनेक कुटुंबांमध्ये असं पाहायला मिळतं की मुलगा आपल्या आईवडिलांशी मोकळेपणाने आपल्या पत्नीच्या आवडी नावडी विषयी सांगू शकत नाही. उलट प्रत्येकवेळी तो पत्नीलाच गप्प करतो. अशावेळी जर दोघांनी एकमेकांना समजून घेतलं तरच पुढे काही होऊ शकेल. कोणत्याही परिस्थित आधी पती पत्नीचं नातं विश्वसनीय असायला हवं, तेव्हाच वातावरण चांगलं बनतं आणि मुलावर चांगले संस्कार होतात.

असंही पाहण्यात येतं की आईवडिल जुन्या युगातील लग्नाशी मुलांच्या लग्नाची तुलना करतात, जे की चांगलं नाही. आधी भांडणं होण्याचे प्रसंगच येत नव्हते. पतीला देव समजलं जायचं, त्याने जो निर्णय घेतला तोच पत्नीला मान्य असायचा. पण आता युग बदललं आहे. मुली शिकून सवरून चांगल्या नोकऱ्या करत आहेत आणि भरपूर पैसा कमवत आहेत. पती पत्नीचं नातं रक्ताचं नातं नसूनही आयुष्यात फार महत्त्वाचं ठरतं. मात्र जे लोक या नात्याचं महत्त्व न समजून घेता, याला खेळ समजतात, एकमेकांच्या भावनेला ठेच पोहोचवतात, त्यांच्याइतका महामूर्ख कोणीच नसेल आणि तिथे कुटुंब उध्वस्त होण्याची वेळ येणं तर स्वाभाविकच आहे.

थोडासा ब्रेक घेऊन तर पाहा…

* मदन कोथुनियां

नातेबंधात स्पेस तितकीच जरूरी आहे जितकं जगण्यासाठी ऑक्सिजन. जसं की जर वातवरणातील ऑक्सिजनचं प्रमाण कमी झालं तर घुसमट जाणवते, अगदी त्याचप्रकारे नातेसंबंधातही स्पेस नसेल तर प्रेमाचा ओलावा हरवू लागतो. जर आपल्या सर्वात गोजिऱ्या नात्याची वीण आयुष्यभर बळकट ठेवू इच्छित असाल तर तुम्हालाही आपल्या बेटर हाफला द्यावा लागेल एक छोटासा ब्रेक.

त्यांचा स्वभाव समजून घ्या, परंतु त्यांची साथ सोडू नका. या ब्रेकनंतर जेव्हा ते परतून तुमच्याकडे येतील, तेव्हा तुमचं हे मिलन हमखास चमत्कारिक असेल. त्यात आपसुकच पूर्वीची टवटवी तुम्ही अनुभवाल. निश्चितच ब्रेकनंतर तुमच्या नात्यात कित्येक पटींनी अधिक गोडवा अन् उत्साह असेल.

‘‘एक वेळ अशी आली होती, जेव्हा आम्हा दोघांना वाटू लागलं की आमचं नातं आता दिर्घकाळ टिकणार नाही, परंतु आज एकमेकांचं मोल आम्हाला कळून चुकलंय, ही कमाल आहे एका छोट्याशा ब्रेकची,’’ असं सांगताना करूणा शर्मांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास झळकत होता.

तुम्ही हे ऐकलं की नाही ठाऊक नाही, परंतु सच्च्या आणि दिर्घकालीन मिलनाकरता दुरावा खूप जरूरी आहे. जर तुमच्या नात्यात कधी ब्रेक लागला नाही, तर निश्चितच तुम्ही त्याचं महत्त्व गमवाल. आजच्या तरुण पिढीला रिलेशनशिपमध्ये थोडीशी स्पेस आणि एक छोटासा ब्रेक हवा असतो. अनेकांनी याचा अनुभव घेतला तेव्हा त्यांना पटलं की काही काळ विलग होऊन पुन्हा एकत्र येणं सुखदायक असतं.

लिव इन रिलेशनशिप, सहजासहजी मिळणारं प्रेम यामुळेच ही नवी पद्धत आता रूढ होऊ लागली आहे. याबद्दल जाणून घेऊ अशाच काही लोकांकडून, ज्यांना जीवनात अशाच एका ब्रेकची गरज होती :

५ महिन्यांचा तो खडतर काळ

जयपूर येथे राहणारी स्मिता सांगते, ‘‘आमच्या नात्याला तब्बल ५ वर्षं पूर्ण झाली. या ५ वर्षांत अंदाजे ५ महिन्यांचा एक दिर्घ अंतराळ आला. जवळपास ३ वर्षं सातत्याने आम्ही प्रेमात ओतप्रोत समरस झालो होतो. सुरूवातीला एकमेकांमध्ये कधीच काही कमतरता जाणवली नाही, परंतु एक वेळ अशीही आली की या नात्यात जीव घुसमटू लागला. एखाद्याला जेव्हा तुम्ही खूप जास्त ओळखू लागता, तेव्हाही समस्या उभ्या राहू लागतात. ज्या गोष्टींकडे पूर्वी सहज दुर्लक्ष करत होतो, त्याच आता अगडबंब वाटू लागल्या होत्या.’’

‘‘अखेरीस तेच झालं, ज्याची भीती होती. परस्पर संमतीने आम्ही या नात्यातून माघार घ्यायचा निर्णय घेतला. दोघांनी शब्द दिला की आता कधी फोन, कोणताही संदेश आणि कुणाच्याही माध्यमातून संपर्क साधायचा नाही आणि घडलंही तसंच. मीसुद्धा माझ्या दुनियेत व्यस्त झाले आणि तेसुद्धा. कधी त्यांची आठवण झाली, तरी मी कधी व्यक्त झाले नाही.

‘‘तब्बल ५ महिन्यांनी मनस्थिती बदलली आणि त्यांची उणिव जाणवू लागली. त्यांच्याशी कधीही न बोलण्याचं वचन दिलं होतं, परंतु माझी नजर पुन्हा त्यांचा शोध घेऊ लागली. निसर्गाने साथ दिली आणि आम्ही पुन्हा एकत्र आलो, परंतु यावेळेस कायमस्वरूपी. इतक्या मोठ्या दुराव्यानंतर एक गोष्ट सिद्ध झाली होती की नातं भले कोणंतही असो, त्यात थोडी स्पेस जरूर असावी.’’

रबरबॅन्ड थिअरी

नात्यातील ही गुंतागुत समजून घ्यायची असेल तर तुम्ही रबरबॅन्ड थिअरी समजून घेणं जरूरी आहे. जॉन ग्रे यांचं पुस्तक ‘मेन्स आर फ्रॉम मार्स अॅन्ड विमन आर फ्रॉम व्हिनस’ स्त्रीपुरुष नातं समजून घेत त्यात सुधारणा करण्यासाठी एक उत्तम पुस्तक आहे. यात स्पष्टपणे पुरुषाची मनोवस्था सांगत त्याची तुलना एका रबरबॅन्डशी केली आहे.

पुरुषांचा हा स्वाभाविक स्वभाव आहे की ते एखाद्या स्त्रीच्या पूर्ण निकट आल्यानंतर काही काळाने दूर जाऊ लागतात. मग भले स्त्री कितीही प्रेम करत असेल. असं होणं स्वाभाविक आहे. आपलं स्वातंत्र्य आणि अस्तित्त्व शोधण्यासाठी ते असं करतात. परंतु हेसुद्धा सत्य आहे की जेव्हा ते पूर्णपणे दूर जातात, तेव्हा ते परतूनही येतात. जेव्हा ते परतून येतात, तेव्हा त्यांचं प्रेम आणि आपल्या जोडीदाराप्रति आस्था अनेक पटींनी वाढलेली असते. स्त्रिया बुहतेकदा त्यांच्या या स्वभावापासून अनभिज्ञ असल्याने त्यांची साथ सोडून देतात.

जाणूनबुजून घेतला ब्रेक

नीरस होणाऱ्या नात्यात पुन्हा पूर्वीची उमेद जागृत करण्यासाठी काही जोडपी जाणूनबुजून ब्रेक घेऊ लागली आहेत. ते जाणून घेऊ इच्छितात की ते खरोखर परस्परांशिवाय राहू शकत नाहीत का? त्यांच्यात खरोखर प्रेम आहे की केवळ आकर्षण? त्यांना वाटू लागलं आहे की दुरावा हाच तो मार्ग आहे, जो त्यांना आपल्या ध्येयापर्यंत पोहोचवेल.

एमबीए स्टुडन्ट विकास शर्मा सांगतात, ‘‘जर आपण दररोज डाळ खाल्ली, तर एक दिवस नक्कीच असा येईल, जेव्हा डाळ खाताना तिटकारा येईल. आपण ज्याप्रमाणे रोज एकाच चवीचं जेवू शकत नाही, अगदी त्याचप्रमाणे दररोज एकाच पॅटर्नचं जीवनही जगू शकत नाही. कुणी तुमच्यापासून कायमचं दूर जाणार त्यापेक्षा त्याला काही दिवसांसाठी स्वत:हून दूर करणं अधिक योग्य आहे.

‘‘मी निशावर जिवापाड प्रेम करतो, जेव्हा तिने मला होकार दिला नव्हता, तेव्हा मी तिला मिळवण्यासाठी काहीही करू शकत होतो, परंतु जेव्हा तिने मला होकार दिला तेव्हा हळूहळू तिच्याप्रतिची ओढ कमी होऊ लागली. तिची प्रत्येक गोष्ट आता माझ्यासाठी तितकीशी महत्त्वाची नव्हती. कारण मला ठाऊक होतं की ती माझ्यावर प्रेम करते आणि मला सोडून कुठेही जाणार नाही. आपल्या या वागणुकीने मी स्वत: हैराण झालो होतो. आपल्या प्रेमाच्या हरवलेल्या जाणीवा पुन्हा परत मिळवण्यासाठी मी निशासोबत एक छोटासा ब्रेकअप केला. ती त्यावेळी खूप रडली. परंतु मी माझ्या मनावर दगड ठेवून तिला स्वत:पासून दूर केलं. सुरूवातीला तिचे फोनही उचलेले नाहीत.

‘‘जवळपास वर्षभरानंतर आम्ही विलग झालो त्याच दिवसापासून माझ्या मनात तिच्याप्रति पुन्हा प्रेम आणि ओढ जाणवू लागली. माझ्याकडे तिचा जो नंबर होता, तो तिने बदलला होता. तिची काहीच खबर नव्हती, परंतु आता माझ्यावर जिवापाड प्रेम करणारी निशा माझ्या जीवनात पुन्हा परतावी असं वाटत होतं. तिच्या मित्रमैत्रीणींना भेटून तिच्या घरचा फोननंबर मिळवला. कदाचित त्यावेळेस ती मला दगाबाज प्रियकर समजत होती, त्यामुळे फोनवर यायलाही ती तयार झाली नाही. आटोकाट प्रयत्न केल्यावर तिची पुन्हा भेट झाली. जेव्हा मी दूर जाण्याचं कारण सांगितलं, तेव्हा रडवेल्या नजरेनं एक टक माझ्याकडे पाहात राहिली. मी तिच्या एका होकारासाठी पुन्हा व्याकूळ झालो होतो. त्यादिवशी मला समजलं की जर हा ब्रेकअप झाला नसता तर आम्ही कधी प्रेमातील गहनता समजू शकलो नसतो.’’

आम्हीसुद्धा याचा अवलंब करतो

विशाल आणि कविताचा प्रेमविवाह झाला. दोघांचं प्रोफेशन समान होतं, शिवाय त्यांचे विचारही सारखे होते. ते सांगतात, ‘‘बहुतेकदा लोक आम्हाला सांगतात की प्रेमाचा उत्साह काही काळात ओसरतो. पूर्वीसारखा उत्साह आणि प्रेम त्यांच्या नात्यात राहत नाही. आम्हाला ठाऊक आहे की आम्हाला आपलं प्रेम दिर्घकाळ जिवंत राखण्यासाठी काय करायचं आहे. प्रेमातील ओलावा टिकवण्यासाठी आम्ही एकमेकांना स्पेस आणि स्वातंत्र्य दिलं पाहिजे. सतत दोघांनी एकत्र असावं ही अपेक्षा बाळगणं योग्य नाही.’’

विशाल सांगतात, ‘‘मी माझ्या पत्नीला तिच्या मित्रमैत्रीणींसोबत आणि कुटुंबासोबत वेळ व्यतित करण्याची मुभा देतो. या कालावधीत मी तिला अजिबात फोन करत नाही. तीसुद्धा मला सतत प्रश्न विचारत नाही. हे करताना आम्ही एकमेकांची सातत्याने काळजी घेतो. जेव्हा आम्ही आमच्या एकांतात राहण्याच्या मूडमधून बाहेर पडून एकत्र येतो, तेव्हा आपोआप आमच्या प्रेमभावनेत चैतन्य संचारलेलं असतं.’’

थोडीशी स्पेस आवश्यक

राजस्थान युनिव्हर्सिटी जयपूरमधील समाजशास्त्राच्या प्राध्यापिका अंजली सांगतात, ‘‘कामाच्या थकव्यानंतर छान झोप येते. चांगल्या झोपेमुळे स्वप्नंही चांगली पडतात. नातीसुद्धा अशाचप्रकारची गोड स्वप्नं आहेत, जी समाधानी असल्यावरच पडतात. परंतु हे तेव्हा घडतं, जेव्हा आपण नाती जगतो. ब्रेक घेण्याचा अर्थ असा नाही की तुम्ही साथिदाराला पूर्णत: विसरून जावं, तर एकांतात विचार करावा की या नातेबंधातून तुम्ही काय प्राप्त केलं आणि सोबतच हेसुद्धा की तुम्ही समोरच्या व्यक्तिला कितपत देऊ केलं? दोन्ही पारड्यांचा समतोल तपासून पाहा आणि विचार करा की जर समतोल साधणं शक्य होत नसेल तर त्यामागचं कारण काय आहे?

‘‘तुमच्यापासून दूर राहून तुमच्या जोडीदारालाही ती स्पेस मिळू शकेल, जेव्हा ते विचार करतील की तुमचं त्यांच्या आयुष्यात किती महत्त्व आहे. कायम त्यांना तुम्ही स्वत:मध्येच गुंतवून ठेवलंत तर तुमच्याबद्दल विचार करण्याची स्पेसही तुम्ही त्यांच्याकडून हिरावून घ्याल आणि ही स्पेस छोट्याशा ब्रेकने त्यांना मिळू शकेल. जरूरी नाही की हा ब्रेक दिर्घकालीन असावा, परंतु इतका जरूर असावा की तुमचं स्मरण केवळ जबाबदारीच्या रूपात होऊ नये तर स्मरणात इतकी तीव्रता असावी की त्यांनी तुमच्या ओढीने परतून यावं.’’

लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही की प्रत्येक पतीपत्नीमध्ये भांडणाचं महत्त्वाचं कारण असुरक्षितता आणि इगो असतं. जर तुम्ही आपल्या पार्टनरला योग्य स्पेस दिली, तर त्याच्या मनात कोणत्याही प्रकारची असुरक्षिततेची भावना उरणार नाही आणि तुम्हालाही ती जाणवणार नाही. तुम्ही दोघांनी प्रेमाने एकमेकांसोबत राहावं, थट्टामस्करी करावी, परंतु संशयाच्या घेऱ्यात अडकून प्रश्नांची सरबत्ती करू नये. कोणत्याही नातेसंबंधात स्पेस दिल्याने विश्वास अधिकच वाढतो. इतकंच नव्हे, तुमचा जोडीदार तुमच्याशी अधिक मोकळेपणाने बोलू शकतो. सोबतच यामुळे तुम्हा दोघांमध्ये प्रेमाचा ओलावा वाढतो. अशावेळी पतीपत्नीने वैयक्तिक स्पेसची काळजी घेतली पाहिजे.

असं असूनही नातेसंबंधात योग्य ताळमेळ बसत नसेल तेव्हा एकमेकांपासून काही काळ विलग होण्याचा प्रयत्न करावा वा दोन आठवड्यांसाठी एकमेकांना संपर्क न साधण्याबाबत परस्पर संमती घ्यावी आणि हे निश्चित केल्यावर स्पष्ट करावं की तुम्ही आत्ताही एकमेकांसोबतच आहात आणि आपलं नातं या कालावधीदरम्यान विशेष राहिल. यानंतर एकत्र वेळ व्यतित करू नका वा एकमेकांना मेसेज पाठवू नका. एकमेकांशी फोनवर बातचित करू नका. हा दुरावा तुमच्यासाठी हे जाणून घेण्यास सहाय्यक ठरेल की तुम्ही या नात्याला किती महत्त्व देता.

हे सुरूवातीला अवघड नक्कीच वाटू शकतं. परंतु जेव्हा तुम्हाला आपल्या जीवनात आपल्या पार्टनरशिवाय बरं वाटतं, तेव्हा कदाचित ब्रेक घेणं अधिक योग्य ठरेल. तुमचं नातं अधिक मजबूत बनवणारा हा उत्तम पर्याय आहे असं म्हणता येईल. आता जर सुरूवातीच्या काही दिवसात ब्रेकअपमध्ये आनंद जाणवला, मात्र त्यानंतर तुम्हाला आपल्या जोडिदारीची उणीव भासू लागती तर तुम्ही पुढाकार घेऊन नातेसंबंध सुधारण्याच्या दृष्टिने प्रयत्न करायला हवेत.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें