कशी कराल घरबसल्या जास्त कमाई

– पारुल भटनागर   

असे म्हणतात की, प्रत्येक संकट एक नवी संधी घेऊन येते. कोरोना हेही एक मोठे संकट होते. परंतु, हाच कोरोना काळ संकटासोबत बऱ्याच संधी घेऊन आला आहे. विशेष करून अशा प्रकारचे व्यवसाय आणि कामांसाठी ही संधी आहे जे शिक्षण, माहिती आणि तंत्रज्ञानाशी संबंधित आहेत. डिजिटल उत्पादने ही व्हर्चुअल म्हणजे आभासी जगाची गरज आहेत, कारण कोरोना काळात ज्या प्रकारे लोक एकमेकांपासून दूर होऊन घरात बंद झाले, तिथे सॉफ्टवेअर, आयटी, ऑनलाइन डिलिव्हरी, व्हर्चुअल शिक्षण, अॅप्लिकेशन या सर्वांची मागणी वाढली आहे. झुम एका रात्रीत करोडपती अॅप्लिकेशन झाले आहे. इतरही अनेक अॅप्लिकेशन अशीच चांगली स्थिती आहे.

या संकट काळात शिकवणीचा व्यवसायही जोरात सुरू आहे. तसे तर कोरोना काळापूर्वीही तो चांगला सुरू होता, मात्र शाळा, महाविद्यालये बंद झाल्यानंतर हा व्यवसाय अधिक जोमाने सुरू आहे. म्हणूनच जर तुम्ही घरात बसून असाल, तुम्हाला नोकरी नसेल किंवा व्यवसाय ठप्प झाला असेल तर तुम्ही तुमच्यातील कलागुण ओळखून त्याचा व्यवसायाच्या रूपात वापर करू शकता. ते कसे, हे माहिती करून घेऊया :

घरबसल्या शिका केक बनवायला

घरात कोणाचा वाढदिवस असो, लग्नाचा वाढदिवस किंवा बारसं असो, प्रत्येक शुभ प्रसंगी केक कापला जातो. कोरोना काळाने हा व्यवसाय जोमाने वाढवण्याचे काम केले आहे. बाजारातून केक विकत घेण्याची भीती लोकांना वाटत आहे. त्याऐवजी ते एखाद्या ओळखीच्या माणसाकडून किंवा घरातच केक बनवू लागले आहेत. म्हणूनच जर तुमच्याकडे केक बनवण्याचे कौशल्य असेल तर तुम्ही हे कौशल्य स्वत:पुरते मर्यादित ठेवू नका. ते इतरांनाही शिकवून तुम्ही चांगली कमाई करू शकता.

यासंदर्भात मेराकी होम बेकरीच्या दीप्ती जांगडा सांगतात की, त्यांना केक बनवायला आवडते आणि लॉकडाऊनच्या काळात त्यांच्या या कलेला चांगला वाव मिळाला आहे. त्या साधे तसेच कस्टमाईज्ड डिझाईनचे केक बनवतात. ज्याला जसा केक हवा असतो ती वस्तू किंवा चित्रासारखाच हुबेहूब केक बनवण्याची कला त्यांच्या अंगी आहे. त्यांनी सांगितले की, त्यांच्या या कलेला लोकांचे चांगले प्रोत्साहन मिळत आहे. ज्यामुळे त्यांचा उत्साह अधिकच वाढला आहे, शिवाय हे त्यांच्या उत्पन्नाचे चांगले माध्यम झाले आहे, जे त्यांचा आत्मविश्वास वाढवण्याचे काम करत आहे.

त्यांनी सांगितले की, साधा केक शिकण्यासाठी रू १,५०० पासून ते रू २,००० पर्यंत तर डिझायनर केक बनवणे शिकवण्यासाठी रू ३,००० पासून ते रू ५,००० पर्यंत खर्च येतो. सांगायचे तात्पर्य असे की, जर तुमच्या अंगी कौशल्य असेल तर तुम्ही घरबसल्या ऑनलाईन प्रशिक्षण देऊन कमाई करू शकता, शिवाय यातून जो आनंद तुम्हाला मिळेल तो अनमोल असेल. त्यासाठी फक्त तुम्हाला तुमच्यातील कलागुण ओळखून त्याचा वापर करून घेणे गरजेचे आहे.

नृत्याची शिकवणी

नृत्य ही लोकांची पूर्वापार चालत आलेली आवड आहे, ज्यामुळे आजही त्याला बरीच मागणी असते. लग्न असो किंवा लग्नाची हळद, पार्टी किंवा स्नेहसंमेलन असो, प्रत्येक ठिकाणी नृत्य केले जातेच. नाचता येत नसल्यामुळे हसे होऊ नये म्हणून नृत्याचे प्रशिक्षण घेणे आवश्यक असते. हौशी लोक नाच शिकण्यासाठी कितीही पैसे मोजायला तयार असतात. जर तुम्हाला एखादे विशिष्ट प्रकारचे नृत्य जसे की, हिपहॉप, बॅले, पारंपरिक नृत्य, शास्त्रीय नृत्य चांगल्या प्रकारे येत असेल तर तुम्ही याचे ऑनलाईन प्रशिक्षण देऊन स्वत:मधील कौशल्य वाढवण्यासोबतच या व्यवसायातून चांगली कमाई करू शकता. कारण तुम्ही घरूनच हे ऑनलाईन शिकवणी वर्ग सुरू करणार असल्यामुळे त्यासाठी विशेष काहीच गुंतवणूक करावी लागणार नाही.

व्यक्तिमत्त्व विकास

मोठी माणसे असोत किंवा मुले, कोरोनाने सर्वांनाच घरात बसवून ठेवले. त्यामुळे घरातील वातावरण कंटाळवाणे झाले आहे. प्रत्येकाला काहीतरी बदल हवा आहे. अशा वेळी तुमच्यामध्ये जर व्यक्तिमत्त्व विकासाचे  कौशल्य असेल तर हा काळ तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. कारण या मोकळया वेळेचा फायदा घेऊन मुलांना सर्व काही शिकवण्याची इच्छा प्रत्येक पालकाला आहे. ज्यामुळे अभ्यासासोबतच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचाही विकास होईल. त्यामुळेच तुम्ही तुमच्यातील कौशल्याच्या बळावर या काळात ऑनलाईन व्यक्तिमत्त्व विकासाचे शिकवणी वर्ग सुरू करा. मुलांसोबत पालकांनाही शिकायची इच्छा असेल तर सवलत मिळेल, अशी ऑफरही तुम्ही देऊ शकता. सध्या व्यक्तिमत्त्व विकासाच्या शिकवणीला बरीच मागणी आहे. तुम्हाला ३-४ लोक मिळाले तरी तुम्ही महिन्याला रू १२,००० ते रू १५,००० पर्यंत कमवू शकता. फक्त तुमच्यातील कौशल्याचा वापर योग्य प्रकारे करणे गरजेचे आहे.

कोडिंगची शिकवणी

तंत्रज्ञानाच्या युगात स्वत:ची ओळख निर्माण करायची असेल तर कोडिंगशी नाते जोडावेच लागेल, हे मुलांना माहिती आहे. कारण आजच्या युगात तंत्रज्ञानाची मदत घ्यावीच लागते. त्यामुळे आयटी शिक्षकांना चांगली संधी आहे, सोबतच मुलांनाही या माध्यमातून नवीन काहीतरी शिकायला मिळत आहे, जे त्यांचे भविष्य अधिक उज्ज्वल बनवण्यास मदत करेल. कोडिंग प्रोग्रामिंग ही एक भाषा आहे जिच्या मदतीने तुम्ही अॅप्स, वेबसाईट्स, सॉफ्टवेअर बनवू शकता. कोरोनानंतर कोडिंगची मागणी वाढली आहे. त्यामुळे जर तुम्ही आयटी म्हणजे माहिती-तंत्रज्ञानाशी जोडले गेले असाल अणि तुमच्याकडे कोडिंगचे चांगले ज्ञान असेल तर तुम्ही ऑनलाईन शिकवणी घेऊन चांगली कमाई करू शकता. यामुळे तुमच्या ज्ञानात भर पडेल, शिवाय तुम्ही चांगले पैसेही कमवू शकाल.

करियरबाबत समुपदेशन

दहावीनंतर कोणत्या शाखेत प्रवेश घ्यायचा किंवा बारावीनंतर कोणते क्षेत्र निवडून आपली कारकीर्द किंवा करियर घडवावे, हे न समजल्याने बरीच मुले गोंधळून जातात. प्रत्यक्षात त्यांच्यावर इतर हुशार मुलांचे तसेच पालकांच्या अपेक्षांचेही दडपण असते. त्यामुळेच ते त्यांच्यातील क्षमता ओळखू शकत नाहीत आणि चुकीचे क्षेत्र निवडल्यामुळे पुढे पश्चातापाची वेळ येते. अशा परिस्थितीत करियरबाबत काऊन्सलिंग म्हणजेच समुपदेशन मुलांसाठी खूपच उपयोगाचे ठरते. त्यांच्याशी बोलून, त्यांची आवड लक्षात घेऊन आणि त्यांना नेमकी अडचण कुठे येते, हे ओळखून त्यांनी कोणत्या क्षेत्रात करिअर घडवायला हवे, यासाठीची मदत करिअर काऊन्सलिंगद्वारे केली जाते. यामुळे त्यांना करिअरबाबत निर्णय घेण्यास मदत होते, शिवाय योग्य करिअर निवडल्यामुळे भविष्यात जास्तीत जास्त यश मिळवण्याची शक्यता अधिक वाढते.

करियरबाबतच्या समुपदेशनाचे महत्त्व कोरोना काळात अधिक वाढले आहे, कारण या काळात जणू मुलांचे करियर पणाला लागले आहे. अशा परिस्थितीत त्यांच्या मनात करियरबाबत निर्माण झालेला संशय समुपदेशनातूनच दूर केला जाऊ शकतो. यासाठी पैसेही चांगले मिळतात. जसे की, तुम्ही २ तास मुलांचे समुपदेशन केले तर तुम्ही एका मुलाकडून कमीत कमी रू २,००० ते रू ३,००० शुल्क घेऊ शकता. तुमच्यात कौशल्य असेल आणि तुम्ही मुलांसह पालकांना चांगले मार्गदर्शन करू शकत असाल तर तुम्ही ऑनलाईन करिअर क्लासेस सुरू करून चांगली कमाई करू शकता.

फिटनेसबाबत प्रशिक्षण

आजकाल बहुतांश लोक स्वत:च्या आरोग्याबाबत जास्त सजग झाले आहेत. म्हणूनच तर त्यांच्या नेहमीच्या वागण्या-बोलण्यात झुंबा, एरोबिक्स, जिम इत्यादी ऐकायला मिळते. इतकेच नाही तर यासाठी ते दरमहा हजारो रूपये खर्च करायला मागेपुढे पाहत नाहीत. हे योग्यच आहे, कारण जर तुम्ही निरोगी असाल तरच जीवनाचा खऱ्या अर्थी आनंद घेऊ शकता. परंतु, कोरोनाने फिटनेसला काहीसा ब्रेक लावला आहे. आता लोक जिम व अन्य प्रकारचे व्यायाम करण्यासाठी एखाद्या प्रशिक्षकाकडे जाऊन शिकणे योग्य समजत नाहीत. अशा वेळी त्यांची गरज आणि तुमच्याकडील कौशल्य तुमच्या कमाईचे माध्यम ठरू शकते. तुम्ही झुम, मीटसारख्या अॅपच्या मदतीने त्यांना घरबसल्या फिटनेसचे प्रशिक्षण देऊ शकता. आजच्या काळात तुमच्याकडील हे कौशल्य खूपच उपयोगाचे ठरेल, कारण आता लोक आपल्या आरोग्याशी तडजोड करू इच्छित नाहीत. दिवस, तास किंवा अभ्यासक्रमाच्या आधारे तुम्ही शुल्क आकारून चांगली कमाई करू शकता.

यासंदर्भात एशियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सचे हेल्थ अँड फिटनेस सल्लागार हरिश कुमार शर्मा यांनी सांगितले की, फिटनेसबाबत प्रशिक्षण देण्याचे कौशल्य तुमच्याकडे असेल तर यासाठी व्यक्तीमागे तुम्हाला स्टँडर्ड अभ्यासक्रमासाठी तासाला रू ५०० ते रू ८०० कमावता येतील. अभ्यासक्रमाच्या प्रकारानुसार तुम्ही शुल्क आकारून स्वत:चे उत्पन्न वाढवू शकता.

प्रवेश परीक्षेसाठी प्रशिक्षण

शिकवणीचा बाजार नेहमीच बहरलेला असतो. मात्र आता कोरोनामुळे ऑनलाईन शिकवणीची मागणी अधिक वाढली आहे, कारण अभ्यासात खंड पडावा असे पालकांना आणि मुलांनाही वाटत नाही. अशा परिस्थितीत जॉईंट इंटरन्स एझिम असो किंवा ग्रॅज्युएट अॅप्टिट्यूट टेस्ट इन इंजिनीअरिंग किंवा बँकिंग सेक्टर इत्यादींसाठीची इंटरन्स एझिम असो. त्यात अपयश पदरी पडू नये यासाठी मुले ऑनलाईन प्रशिक्षण घेऊन या इंटरन्स एझिमची म्हणजे प्रवेश परीक्षेची तयारी करत आहेत. त्यामुळेच तुम्ही जर यापैकी एखाद्या अभ्यासक्रमासाठी प्रशिक्षण देऊ शकत असाल आणि जर याचे चांगले ज्ञान तुम्हाला असेल तर तुम्ही ऑनलाईन प्रशिक्षण देऊन घरबसल्या तासिकेच्या हिशोबानुसार चांगली कमाई करू शकता.

व्यावसायिक प्रशिक्षण

कोरोनामुळे तुम्हाला नोकरी गमवावी लागली असेल किंवा नोकरी सोडून स्वत:चा व्यवसाय करण्याची तुमची इच्छा असेल, पण कोणता व्यवसाय करावा, ज्यामुळे स्वत:चा चांगला फायदा होईल आणि ग्राहकांशीही ओळख होईल, हेच जर तुम्हाला समजत नसेल तर यासाठी तुम्हाला व्यावसायिक प्रशिक्षकाची मदत घ्यावी लागेल. यामुळे व्यवसायाच्या उत्तुंग शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक असलेली लहानात लहान गोष्टही तुम्हाला प्रशिक्षकाकडून शिकून घेता येईल. जर तुम्हाला व्यवसाय आणि बाजाराबाबत चांगले ज्ञान असेल आणि बाजाराची सध्याची मागणी काय आहे किंवा एखाद्या व्यक्तीशी बोलल्यानंतर तो कोणता व्यवसाय करायला सक्षम आहे, हे तुम्ही अचूक ओळखू शकत असाल तर तुम्ही व्यवसायाचे ऑनलाईन प्रशिक्षण देऊन स्वत:चे उत्पन्न वाढवण्यासोबतच लोकांना व्यवसाय सुरू करण्यासाठी मदतही करू शकता.

विषयानुरूप प्रशिक्षण

कोरोनामुळे ‘वर्क फ्रॉम होम’ अर्थात घरी बसून काम करण्याची संस्कृती वाढली आहे. अशा वेळी जर पतीपत्नी दोघेही नोकरदार असतील तर ते मुलांच्या अभ्यासाकडे पुरेसे लक्ष देऊ शकत नाहीत. शाळेचे ऑनलाईन वर्गही नावापुरतेच आहेत. त्यामुळेच मुलांना अतिरिक्त शिकवणीची गरज भासू लागली आहे. तुम्ही जर एखाद्या विषयाचे तज्ज्ञ असाल तर त्या विषयाचे ऑनलाईन प्रशिक्षण देऊ शकता. या माध्यमातून कमी वेळेत तुम्ही जास्त पैसे कमवू शकता. तुम्ही एखाद्या मुलाला किंवा दोन अथवा त्याहून अधिक मुलांनाही एकत्र ऑनलाईन शिकवू शकता.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें