असे शिकवा मुलांना चित्र काढायला

* पद्मा अग्रवाल

लॉकडाऊनमुळे आयुष्य जणू थांबले आहे. मुले बऱ्याच दिवसांपासून घरातच बंद आहेत. शाळेची सुट्टी सुरू आहे. मुले आपल्या मित्रांसह खेळण्यासाठी उद्यानात जाऊ शकत नाहीत. घराच्या चार भिंती त्यांच्यासाठी कैदखाना झाल्या आहेत. ती कधी खेळण्यासाठी आईचा मोबाइल घेतात, तर कधी वडिलांचा.

वन्या स्वयंपाक घरातील कामं आटोपून आली. त्यावेळी आपला ५ वर्षांचा मुलगा अन्वय आपल्या मोबाइलवर गेम खेळत असल्याचे पाहून तिला राग आला. तिने त्याच्या हातातून मोबाइल हिसकावला, त्यामुळे तो रडू लागला. वन्याच्या हे लक्षात आले की, मुलाला कशात तरी गुंतवून ठेवावे लागेल. म्हणून ती मुलाला म्हणाली की, चल आपण चित्र काढूया. पण अन्वय रडत होता. जेव्हा वन्या स्वत:च कागद घेऊन त्यावर चित्र काढू लागली, तेव्हा अन्वय तिच्याजवळ गेला.

जर तुमचा मुलगा छोटा असेल तर त्याला संपूर्ण वही देऊ नका. नाहीतर तो थोडया वेळातच त्याला हवे तशी पाने रंगवून संपूर्ण वही खराब करून टाकेल. म्हणून त्याला वहीचे फक्त एक पान द्या.

चला वर्तुळ बनवायला शिकवू या

तुमची बांगडी किंवा एखाद्या गोल झाकणाच्या साहाय्याने मुलांना वर्तुळ कसे काढायचे हे शिकवा. त्यानंतर त्याला स्वत:हून वर्तुळ काढायला लावा. जेव्हा अन्वयने स्वत: वर्तुळ काढले तेव्हा तो खूपच खुश झाला.

अशाच प्रकारे निशीने आपली ८ वर्षांची मुलगी ईशी समोर एक केळे ठेवले आणि तिला केळे किंवा टोमॅटो, आंबा असे एखादे चित्र काढायला सांगितले.

पेपरवर केळयाचे चित्र काढल्यानंतर ईशीला खूपच आनंद झाला. नंतर आईने जो रंग वापरला त्याच रंगाने ते चित्र रंगवताना तिला गंमत वाटली. त्यानंतर चित्र काढणे आणि रंगवणे हा तिच्यासाठी आवडता खेळ झाला.

एके दिवशी निशीने स्वत:चा मोबाइल ईशासमोर ठेवून सांगितले की, मोबाइलचे चित्र काढ. जेव्हा तिने मोबाइलचे चित्र काढून त्यावर डायल करण्यासाठी आकडेही काढले तेव्हा ते पाहून निशीने प्रेमाने तिचे चुंबन घेतले.

मुलांना प्रोत्साहन द्या

मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी काढलेले चित्र भिंतीवर लावा. त्या चित्राचे कौतुक करा.

अनुचा १२ वर्षांचा मुलगा चित्रे तर काढायचा, पण ती रंगवायला कंटाळा करायचा. अनु स्वत: चांगली आर्टिस्ट आहे. जेव्हा मुलाने काढलेल्या चित्रात ती स्वत: रंग भरू लागली तेव्हा ते पाहून आरवलाही चित्र रंगवावेसे वाटू लागले. त्यानंतर काढलेल्या चित्रांमध्ये स्वत:हून भरलेले रंग पाहून तो आनंदित झाला.

तुम्ही मार्गदर्शनासाठी यू ट्यूबची मदतही घेऊ शकता. मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी भावंडांमध्ये चित्रकलेची स्पर्धा घ्या. यामुळे त्यांच्यात जिंकण्याची इच्छा निर्माण होईल आणि ते चित्रांमध्ये रमून जातील. चांगल्या प्रकारे चित्र पूर्ण करण्याचा प्रयत्न करतील.

मुलांना त्यांच्या कल्पनाशक्तीनुसार काहीही काढायला सांगा. ती त्यांच्या कल्पनेनुसार खूप काही काढू शकतात. जसे एखाद्याला आपल्या शाळेची आठवण येत असेल, एखाद्याला मित्राची आठवण येत असेल तर ते चित्राच्या माध्यमातून या भावना कागदावर उतरवण्याचा प्रयत्न करतील.

मुलाला प्रोत्साहन देण्यासाठी त्याला शाबासकी द्या. तुम्ही त्याला छोटे बक्षीसही देऊ शकता. त्याच्या पेपरवर छान, खूपच छान किंवा अतिउत्तम असा शेरा द्या. हे पाहून लहान मुले खूपच खुश होतात आणि त्यांना स्वत:चा अभिमान वाटू लागतो.

मुलांचा व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करून चित्र तेथे शेअर करायला सांगा. यामुळेही मुले आणखी चांगले चित्र काढण्याचा प्रयत्न करतील.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें