नातं जन्मांतरीचं – दूसरा भाग

(अंतिम भाग)

दिर्घ कथा * रजनी दुबे

आत्तापर्यंत आपण वाचलंत :

आयएएसच्या कोचिंगसाठी पारूल दिल्लीतल्या एका गर्ल्स होस्टेलमध्ये येऊन राहिली होती. एकदा ती जेवायच्या सुट्टीत बाहेर पडली अन् पावसात अडकली. पावसापासून बचाव व्हावा म्हणून ती एका बंगल्याच्या व्हरांड्यात जाऊन उभी राहिली. तेवढ्यात आतून रांगत एक लहान मुलगी व्हरांड्यात आली. पारूलनं तिला उचलून घेतलं व ती घरात गेली. तिथं बाळाची आजी भेटली. मग पारूल रोजच तिला व आजींना भेटायला जाऊ लागली. तिथंच डॉ. प्रियांशुशी भेट झाली. त्यानं पारूलला लग्नाची मागणी घातली. दोन्ही घरातून या नात्याला सहर्ष स्वीकृती मिळाली. पारूल लग्न होऊन घरी आली. प्रिया, ते बाळ म्हणजे डॉ. प्रियांशुच्या दिवंगत बहिणीची मुलगी होती. बाळाच्या वडिलांचा घरात कधी उल्लेख होत नव्हता. पण पारूलला एकदा त्यांचा पत्ता मिळाला व तिनं शेखरला, प्रियाच्या वडिलांना पत्र टाकलं…

आता पुढे वाचा :

सुमारे एक महिन्यानंतर घराची डोअर बेल वाजली. बाहेर कुणी अनोळखी माणूस उभा होता. ‘‘डॉ. प्रियांशु, मिसेस पारूल व कमलाबाईंना बोलवा. कोर्टाचं समन्स आहे,’’ त्यानं म्हटलं. एव्हाना आई पण तिथं आल्या होत्या. त्यानं आमच्या सह्या घेऊन काही कागद आम्हाला दिले व तो निघून गेला. मी ते कागद जेव्हा वाचले, तेव्हा घेरी येईल की काय असं मला वाटलं. शेखरनं आमच्यावर केस केली होती. आम्ही त्याच्या नावाचा वापर प्रियंवदाच्या अनौरस मुलीचा बाप म्हणून केल्याचा आरोप आमच्यावर केला होता. त्याखेरीज त्याची बेअब्रू केली होती व त्याच्या संपत्तीवर अधिकार सांगत होतो असंही त्यात म्हटलं होतं.

एवढंच नाही तर बिचाऱ्या निरागस प्रियालाही त्यात त्यानं ओढलं होतं. प्रतिवादी क्रमांक ४ प्रिया-वय-९ महिने. (आत्मजा-वडील अज्ञात) मला एकदम धक्काच बसला, कुणी माणूस एवढा निष्ठूर कसा होऊ शकतो अन् इतक्या खालच्या पातळीवर कसा उतरू शकतो? मला रडूच यायला लागलं. आई पण रडत होत्या. त्या सर्व कागदपत्रात माझ्या पत्राची झेरॉक्सही टाचणीनं लावलेली होती. त्याचाच आधार घेत त्या हलकट माणसाने कोर्टात धाव घेतली होती अन् कोर्टाला विनंती केली होती की आम्ही प्रियाच्या वडिलांच्या जागी त्याचं नाव लावण्यावर प्रतिबंध करण्यात यावा. नुकसानभरपाई म्हणून त्यानं आमच्याकडून काही लाख रूपये मागितले होते. मी तर हतबद्ध झाले.

तेवढ्यात मम्मींनी फोन करून प्रियांशुला घरी बोलावून घेतलं. त्या दिवशी प्रथमच मी त्यांना इतकं संतापलेलं बघितलं…प्रथम अन् शेवटचंही.

माझे खांदे धरून गदागदा हलवत ते म्हणाले, ‘‘काय गरज होती त्या हलकटाला पत्र लिहिण्याची? मुळात तो माणूसच नाहीए. आधी प्रियंवदाला नादी लावलं. जेव्हा बाबा तिला संपत्तीत थारा देत नाहीत हे लक्षात आलं, तेव्हा त्यानं तिला गरोदर अवस्थेत एकटी टाकली अन् निघून गेला. ती बिचारी उपाशी तापाशी बेशुद्धावस्थेत पडलेली शेजाऱ्यांनी बघितली अन् तिला सरकारी इस्पितळात घेऊन गेले. माझ्या सुर्दैवानं माझा एक डॉक्टर मित्र तिथं काम करत होता. त्यानं प्रियंवदाला ओळखलं अन् मला फोन केला. मी तिथं पोहोचलो. बहिणीला घरी आणली. विचार कर, ज्या मुलीचा बाप इतका प्रतिष्ठित डॉक्टर, भाऊ परदेशातून डिग्री घेऊन आलेला, स्वत:चं हॉस्पिटल अन् ती अनाथासारखी मळकट, फाटक्या कपड्यात किती दिवसांची उपाशी सरकारी दवाखान्यात होती. आम्ही तिला घरी आणली, तोवर फार उशीर झाला होता. प्रियाला जन्म देतानाच ती मृत्यू पावली. बाबांनाही या गोष्टीचा फारच धक्का बसला…थोडे दिवस आधी आम्हाला कळलं असतं तर प्रियंवदाला आम्ही वाचवू शकलो असतो.’’

थोडे क्षण थांबून पुन्हा प्रियांशु बोलायला लागले. ‘‘मग आम्ही प्रियंवदाच्या मृत्यूची बातमी त्याला दिली. मेरठला त्याच्या घरी गेलो. बायकोच्या चितेला अग्नि देण्यासाठी त्याला विनंती केली. पण तो नालायक साफ नाही म्हणाला.’’

त्याचे वडिल म्हणाले, ‘‘हे बघा, जे व्हायचे, ते घडून गेलंय. आता या गोष्टीची उगीच फार वाच्यता करू नका. तुमच्या मुलीच्या नादात तो आम्हाला दुरावला होता. त्याला एकापेक्षा एक चांगली स्थळं सांगून येताहेत. आम्ही त्याचं लग्न करतो आहोत. इथलेच चांगले खानदानी लोक आहेत. तुम्ही निघा…उगीच तमाशे नकोत.’’ मुकाट्यानं मी व बाबा परत घरी आलो. त्या धक्क्यानं पाच दिवसातच बाबा गेले. एक दिर्घ श्वास सोडून यांनी पुन्हा माझ्याकडे रागानं बघितलं अन् म्हणाले, ‘‘त्या नरपशूचं नावही मला ऐकायला नको वाटतं अन् तू हे काय करून बसलीस?’’

मी फक्त रडत होते. बोलणार काय? केवढा अनर्थ करून बसले होते. काही वेळ कुणीच काही बोललं नाही. मग मी डोळे पुसून म्हटलं, ‘‘एकदा वकील काकांचा सल्ला घेऊयात का?’’

आईही म्हणाल्या, ‘‘हो रे, एकदा वकील साहेबांना भेटून तर घ्या. मग काय करायचं ते बघू.’’

हे मुकाट्यानं माझ्यासोबत आले. आम्ही दोघं वकिलकाकांच्या घरी गेलो.

लग्नापूर्वी मी त्यांच्याकडे जातच होते. कधी कधी त्यांच्याबरोबर कोर्टातही जात होते. काका त्यांच्या ऑफिसमध्येच बसलेले होते. आम्ही सगळे कागद त्यांच्या पुढ्यात ठेवले.

त्यांनी लक्षपूर्वक सगळे पेपर्स बघितले. मग म्हणाले, ‘‘घाबरण्यासारखं काहीच नाहीए. फक्त लग्न झालं होतं हे सिद्ध करावं लागेल. लग्नाचा फोटो अन् मॅरेज सर्टिफिकेट लागेल. मुलीचं बर्थ सर्टिफिकेट तुमच्याकडे आहेच.’’

प्रथमच प्रियांशु म्हणाले, ‘‘फोटो प्रियंवदानं पाठवला होता, पण बाबांनी रागानं तो फाडून टाकला. बहुधा त्यातच लग्नाचं सर्टिफिकेटही असेल.’’

वकील काका विचारात पडले. म्हणाले, ‘‘हा माणूस फारच कलुषित प्रवृत्तीचा दिसतोय. पूर्ण तयारीनिशी तो कोर्टात गेलाय…तरी हरकत नाही. लग्नाचे कुणी साक्षीदार तर असेलच ना? कोणी मित्र, मैत्रीण, भटजी, शेजारी…त्यांची साक्ष आपल्याला काढता येईल.’’

वकील काकांकडून सगळं नीट समजून घेऊन अन् साक्षीदार कसे मिळवायचे याचा विचार करून आम्ही तिथून निघालो. चार पाच दिवस सतत आम्ही प्रियवंदाचे मित्रमैत्रीणी आणि शेजारी शोधत होतो. पण दिल्लीसारख्या महानगरात ते काम सोपं नव्हतं. किती मंदिरं, किती देवळं, पंडित, भटजींना विचारलं. प्रियंवदाच्या मित्र मैत्रिणींना तर तिच्या प्रेमप्रकरणाची व लग्नाचीही कल्पना नव्हती. प्रत्येकाचं म्हणणं होतं की ती इतकी शांत अन् सज्जन मुलगी होती की शेखरसारख्या मुलाबरोबर तिचं प्रेमप्रकरण असणं शक्यच नाही. शेखरच्या काही मित्रांनां ती दोघं बरोबर फिरायची एवढं ठाऊक होतं, पण लग्नाबद्दल माहीत नव्हतं. पूर्वी जिथं प्रियंवदा राहत होती अन् ज्या शेजाऱ्यांनी तिला इस्पितळात दाखल केलं होतं, ती माणसंही आता तिथं राहत नव्हती. सात दिवस सतत भटकल्यानंतर आम्ही पुन्हा वकील काकांसमोर होतो. आमच्याकडे एकही पुरावा नव्हता. प्रियाच्या जन्माचं प्रमाणपत्र होतं, पण त्यावरच शेखरनं आक्षेप घेतला होता की स्वत:चं इस्पितळ असल्याचा फायदा घेऊन प्रियांशु त्यांना कारण नसताना प्रियाचे वडिल असल्याचं म्हणताहेत. काय करावं तेच आम्हाला सुचत नव्हतं.

वकील काका म्हणाले, ‘‘कोर्टात फक्त पुरावे लागतात. शेखरनं आधीच सगळी फिल्डिंग सज्ज करून ठेवली आहे. त्याला खोटा ठरवायला आपल्याकडे काहीच पुरावा नाहीए.’’

मला खरंतर बिचाऱ्या प्रियंवदाचा खूपच राग आला. दिल्लीसारख्या शहरात राहणारी, श्रीमंत घरातली मुलगी इतका मूर्खपणा कसा करू शकते. कुठल्याही पुराव्याशिवाय लग्न केलं…मूल होऊ घातलेलं अन् नवरा सोडून गेल्यावर मुकाट उपाशी राहिली, पण आता चिडून रागवूनही उपयोग नव्हता. ‘‘आपण प्रोटेस्ट करू शकतो,’’ असं वकील काका म्हणाले.

‘‘तो कोर्टात जिकंला तर काय होईल?’’ प्रियांशुनं विचारलं.

‘‘प्रियाला बाप म्हणून शेखरचं नाव लावता येणार नाही…अन् त्याच्या इस्टेटीत वाटा मिळणार नाही,’’ वकील काकांनी समाजावलं.

काही वेळ विचार करून प्रियांशु म्हणाले, ‘‘प्रियाला बाप म्हणून त्याच्या नावाची गरजच नाहीए अन् संपत्तीचं म्हणाल तर बाबांनी प्रियंवदाच्या नावानं ठेवलेली संपत्तीच इतकी आहे की प्रियाला कधीच आयुष्यात दहाद भासणार नाही.’’

‘‘मग तर सोपेच झाले,’’ वकील काका म्हणाले, ‘‘तुम्ही कोर्टात जाऊच नका. हजर राहिला नाहीत तर कोर्ट एकतर्फी डिक्रि त्याला देईल.’’

मला हे खरं तर पूर्णपणे पटलं नव्हतं. पण आम्हाला दुसरा काही पर्यायही उपलब्ध नव्हता. जेव्हा जेव्हा मी प्रियाला बघायचं, तेव्हा तेव्हा मला त्या नोटीशीमधला (आत्मजा-वडील अज्ञात) हे शब्द फारच खटकायचे. मी शेखरला ते पत्र लिहिण्याचा भोचकपणा केला नसता तर ही वेळच आली नसती. दिवस सरतच होते. एक दिवस टपाल आलं त्यात शेखरचं पत्र अन् कोर्टाच्या निर्णयाची कॉपी होती. त्यात प्रिया शेखरची मुलगी नाही अन् मी, आई व प्रियांशुनं तिचे वडिल म्हणून शेखरचा उल्लेख करू नये अशी तंबी होती. शेखरनं अगदी शिस्तबद्ध डाव टाकला होता.

मी बराच वेळ ती पत्रं हातात घेऊन बसून होते. आईंना व प्रियांशुला कसं सांगावं याचा विचार करत होते. एकाएकी मला काय सुचलं तर मी प्रियाला कडेवर घेऊन सरळ वकील काकांच्या ऑफिसात पोहोचले. मी जे बोलले त्याला वकिल काकांची पूर्ण सहमती होती. परतताना माझ्या हातात काही महत्त्वाचे पेपर्स होते. मी गेल्या गेल्या ते मम्मींना अन् प्रियांशुना दाखवले. ‘‘यावर प्लीज सही करा,’’ मी म्हटलं. त्यांनी आश्चर्यानं माझ्याकडे बघितलं. प्रियाला कवटाळत मी म्हटलं, ‘‘मी प्रियाला कायदेशीर दत्तक घेऊन माझी मुलगी म्हणून वाढवणार आहे. प्रियाचे वडिल डॉ. प्रियांशु आणि आई पारूल असणार आहे.’’

आईंना तर आनंदानं रडूच फुटलं. त्यांनी मला प्रियाला मिठीत घेऊन खूप आशिर्वाद दिले. प्रियांशुही भिजल्या डोळ्यांनी माझ्याकडे बघत होते. त्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि कृतज्ञता होती. आता काम सोपं होतं. आम्ही कोर्टाकडून रीतसर सर्व प्रक्रिया पूर्ण करून प्रियाला दत्तक घेतलं.

आता तिच्या नावापुढे वडिलांचं नाव होतं डॉ. प्रियांशु. मला खूपच समाधान वाटलं. पण मनांत एक भीती होती की प्रिया मोठी झाल्यावर तिला जर घरातल्या गडी माणसांकडून किंवा बाहेरच्या कुणाकडून काही कळलं तर? त्याचवेळी मला बाळ होणार असल्याची चाहूल लागली. प्रियाला भावंड मिळणार याचा आनंद मला उपभोगता येत नव्हता. शेवटी आईंनी माझ्या बाबांना बोलावून घेतलं. त्यांनी मला मानसोपचार तज्ज्ञांकडे नेऊन उपचार केले. त्यांनी प्रियांशुलाही दिल्ली सोडून दूर कुठंतरी जाण्याचा सल्ला दिला. माझ्या बाबांनी सुचवलं, रायपूरला त्यांचं हॉस्पिटल आहेच. मोठं घरही आहे. प्रियांशु तिथं प्रॅक्टिस करू शकतील. प्रियांशु व बाबांनी मिळून रायपूरचं हॉस्पिटल आधुनिक करून घेतलं. रायपूरचं घरही रिनोव्हेट करून त्याला दिल्लीच्या घरासारखं करून घेतलं. माझ्या व प्रियाच्या सुखासाठी आईही रायपूरला राहायला कबूल झाल्या. एवढी सगळी तयारी झाल्यावर लहानसा प्रियंक आणि त्याहून थोडी मोठी प्रिया यांना घेऊन आम्ही रायपूरला आलो.

माहेरी आता कुणी नव्हतंच. माझे काकाकाकू मुलाकडे कॅनडाला होते. इथं कुणालाही प्रियाच्या पूर्वायुष्याबद्दल काहीही माहीत नव्हतं. दोघं मुलं माझीच म्हणून वाढत होती. प्रिया तर आधीपासून मला आई अन् यांना बाबा म्हणत होती. या वातावरणात आम्ही लवकरच रूळलो. उत्तम डॉक्टर म्हणून प्रियांशुनंही इथं लवकरच जम बसवला.

आयुष्य मजेत चाललं होतं. दोन्ही मुलं अभ्यासात अन् इतर एक्टीव्हिटीजमध्ये अव्वल होती. आपसात दोघांचं छान पटायचं. प्रिया त्यावेळी नववीत असेल.

अवचित तिने मला प्रश्न केला, ‘‘मम्मा, आजोबा सांगत होते तुला कलेक्टर व्हायचं होतं…मग का नाही झालीस?’’ मी यांच्याकडे बघितलं. ते म्हणाले, ‘‘कलेक्टर व्हायचं होतं, पण तुझ्या मम्माला तुझी आई होण्याची फार घाई झाली होती, त्यामुळे ती आई झाली अन् मग कलेक्टर व्हायचं राहून गेलं.’’

मी म्हटलं, ‘‘बाळा, माझं स्वप्नं होतं कलेक्टर व्हायचं. पण तुझे बाबा मला बघून असे माझ्या प्रेमात पडले की मला त्यांच्याशी लग्न करावंच लागलं. मग तू मिळालीस आम्हाला अन् मला आपल्या स्वप्नाचा विसर पडला.’’ बोलता बोलता मी त्या जुन्या काळात रमले.

प्रियाला काय वाटलं कुणास ठाऊक. माझ्या गळ्यात हात घालून म्हणाली, ‘‘डोंट वरी मम्मा. तुझं स्वप्नं आता तुझी मुलगी पूर्ण करेल.’’ मग भावाचा कान धरून म्हणाली, ‘‘हे बघ रे, मी आता डॉक्टर होणार नाही. डॉक्टर तुला व्हायचंय. मी आता कलेक्टर होणार. आईचं स्वप्नं पूर्ण करणार.’’

त्या दिवशीपासून ती खरंच अशा उत्साहानं अभ्यासाला लागली की मला तिचं कौतुकच वाटलं. तिनं सायन्सचे विषय बदलून आर्टसचे विषय घेतले. एम.ए. झाल्यावर यूपीएससीच्या परीक्षा दिल्या. तिथं यश मिळवल्यावर मसुरीला ट्रेनिंग पूर्ण केलं. त्यानंतर तिची नेमणूक रायपूरलाच अतिरिक्त कलेक्टरच्या पदावर प्रशिक्षणार्थी उमेदवार म्हणून झाली. तिच्या बॅचची अजून सहा मुलं होती. आम्ही त्या सर्वांनाच डिनरसाठी बोलावलं. सगळीच मुलं हुशार, मनमिळाऊ, अत्यंत सुसंस्कृत अन् तरूण वयाला साजेशा उत्साहानं ओतप्रोत अशी होती. मजेत जेवणं आटोपली. माझ्या लक्षात आलं की त्यापैकी एका मुलाशी प्रियाची वागणूक थोडी वेगळी होती. तोही तिच्याकडेच अधिक लक्ष देत होता. त्यांनी आपापली ओळख करून दिली, तेव्हा कळलं होतं की त्याचं नाव शरद आहे. तो गुजरातमधला आहे. वडील आर्मीत आहेत. मी एकदम ‘मुलीची आई’ या भूमिकेतून त्याच्याकडे बघायला लागले. प्रियासाठी, तिचा नवरा म्हणून मला हा मुलगा एकदमच आवडला. दोघं एकमेकांना ओळखतात अन् बहुधा ती एकमेकांच्या प्रेमातही असावीत…मी यांना तसं बोलूनही दाखवलं. पण यांनी माझं म्हणणं पार उडवून लावलं. ‘‘अगं, किती जुन्या पद्धतीनं विचार करतेस? नव्या काळातली मुलं आहेत. आपसात मोकळेपणानं राहतात. तू लगेच प्रेमात आहेत वगैरे कसं ठरवतेस?’’ मी मात्र माझ्या मुद्दयावर ठाम होते अन् दोनच दिवसात मला त्याची प्रचिती आलीय. सायंकाळी प्रिया घरी आली तेव्हा तिच्या बरोबर शरदही होता. मी लगेच चहा फराळाची तयारी केली. ते सगळं आटोपत आलं तेव्हा शरद अन् प्रियाच्या एकमेकांना काही खाणाखुणा सुरू आहेत, असं माझ्या लक्षात आलं.

मी एकदम सावध झाले. एखादी गोष्ट हवी असली किंवा स्वत:च्या मनासारखं करून घ्यायचं असलं की दोन्ही मुलं मला आई म्हणतात. एरवी मी मम्मा असते. मी ही म्हटलं, ‘‘बोल ना, काय म्हणतोस?’’

मग शरदनं अगदी शांतपणे प्रियाच्या व त्याच्या ओळखीपासून सगळी हकीगत सांगितली. स्वत:बद्दलही सांगितलं. वडिल आर्मित ब्रिगेडियर आहेत. आईही सोशल वर्कर आहे. तो एकच मुलगा. बहीण विवाहित आहे. त्यांच्या घरी प्रिया सर्वांना पसंत आहे. त्याची प्रियाशी लग्न करण्याची इच्छा आहे. प्रियाही त्याला पसंत करते. त्याला आता माझी अन् बाबांची संमती हवी आहे. मला तर मुलगा आवडलाच होता. प्रियांशुचीही या नात्याला हरकत नव्हती…पण त्याचवेळी मला वाटलं की शरदला प्रियाच्या दत्तक प्रकरणाबद्दल माहिती असायला हवी. मी त्याला म्हटलं, ‘‘मला जरा तुझ्याशी एकट्याशी फार महत्त्वाचं बोलायचं आहे.’’

प्रिया हसत हसत म्हणाली, ‘‘बघ रे बाबा, आई नक्की तुला ब्लॅकमेल करेल, माझ्या मुलीचा पिच्छा सोड, भरपूर पैसे देते म्हणेल, तर ते पैसे ठेऊन घे. फिल्मी हिरोसारखा पैसे नको म्हणू नकोस, उलट ती ऑफर करेल त्यापेक्षा अधिकच पैसे माग…मग आपण शॉपिंगला जाऊ.’’

मी तिच्या विनोदाकडे दुर्लक्ष करून शरदला माझ्या खोलीत घेऊन गेले. खोलीचं दार बंद करून घेतलं. कपाटातून ती जुनी फाईल काढली. त्याला सांगितलं, ‘‘प्रिया माझी व प्रियांशुची मुलगी नाही. आम्ही तिला दत्तक घेतलीय. ती प्रियंवदाची व शेखरची मुलगी आहे.’’ सगळी हकीगत सांगितली. जुनी कागदपत्रं दाखवली.

‘‘प्रियाला किंवा कुणालाच हे सत्य ठाऊक नाही. मी तर तिला स्वत:च्या रक्ताचीच मुलगी मानते, पण…तू आता तिचा आयुष्याचा जोडिदार होतो आहेस, तेव्हा तुला हे माहीत असायला हवं, या भावनेतून हे सगळं सगळं सांगितलं आहे. काय निर्णय असेल तो सांग.’’

मी जे केलं ते योग्य अयोग्य मला कळत नव्हतं. हे सगळं उघड करायला हवं होतं की नव्हतं? मुलीचं आयुष्य मी स्वत:च उद्ध्वस्त करत होते का?

मी डोळे मिटून घेतले. शरदनं माझे हात आपल्या हातात घेतले व म्हणाला, ‘‘मम्मा, यू आर ग्रेट…सगळं मला सांगितलंत, एवढा विश्वास माझ्यावर ठेवला याबद्दल मी कृतज्ञ आहे. प्रियाशी लग्न करणार हा निश्चय आता अधिकच दृढ झाला आहे. तुम्ही अगदी निर्धास्त राहा.’’

त्यानंतर शरदचे आईवडिल आमच्याकडे आले. खेळकर वातावरणात आमची भेट द्ब्राली. साखरपुडा करून घ्यायचा असं ठरलं. प्रियंकही एव्हाना त्याचं एम.एस पूर्ण करून अमेरिकेहून परतला होता. आम्ही हॉटेलातच हा समारंभ आयोजित केला होता. माझ्या बाबांचे आर्मीतले, रिटायर झालेले मित्र राज्यपाल झाले होते. बाबांनी नातीच्या साखरपुड्यात त्यांनाही बोलावलं होतं. प्रिया व शरदचे कलीग, मित्रमैत्रीणी, शरदच्या घरचे, अगदी जवळचे नातेवाईक, आमची परिचित मंडळी असे सगळे जमले होते. समारंभ खूपच आनंदात व उत्साहात पार पडला…त्याच समारंभाचे फोटो बघत असताना तो फोन आला होता.

आता मी पूर्णपणे शुद्धीवर आणि भानावरही आले होते. प्रिया कुठाय माझ्यावर रागावली आहे का ती? तेवढ्यात मुलगा जागा झाला. धडपडून उठला अन् माझ्या जवळ येत आनंदानं ओरडला, ‘‘आई… कसं वाटतंय? तुझ्या लाडक्या लेकीनं तर मला गेले चार दिवस धारेवर धरलं होतं. काल तेव्हा मी परोपरीनं समजावलं की आई आता पूर्ण बरी आहे, उद्या सकाळपर्यंत डोळे उघडेल तेव्हा कुठं बाबांना घरी घेऊन जाण्याच्या निमित्तानं तिला घरी पाठवली. दोघंही शंभरदा बजावून गेलेत की रात्री जरी आई शुद्धीवर आली तरी ताबडतोब फोन कर…’’

तेवढ्यात त्याची नजर दाराकडे गेली अन् तो म्हणाला, ‘‘घ्या, हे आलेच तुमचे देवदास अन् तुझी चमची…न बोलावता हजर व्हायची सवय आहे ना?’’ त्याच्या चेहऱ्यावर प्रसन्न हास्य होतं. आनंदानं चेहरा उजळला होता.

मी बघितलं दारातून प्रिया अन् प्रियांशू त्वरेनं आले अन् माझ्या बेडशेजारी येऊन उभे राहिले. प्रिया तर माझ्या छातीवर डोकं ठेवून रडायलाच लागली…‘‘काय हे आई, किती घाबरवून सोडलंस गं! माझ्या लग्नाच्या दु:खानं जर असं झालं असेल तर मला लग्नच करायचं नाही…’’

मुलगा लगेच म्हणाला, ‘‘पुरे गं, आईला आनंद सहन झाला नाही. तिला खूपच आनंद झालाय…खरं तर आनंदानं हार्ट अटॅक मला यायचा की चला, घरावरचं एक संकट शरदकडे गेलं. आता घरावर एकछत्र साम्राज्य माझं!’’

प्रियानं खोट्या रागानं त्याचा कान धरला. ‘‘मोठा आलाय अमेरिकेतून शिकून. चार दिवस लावलेस आईला बरं करायला…आधी डॉक्टरी तर कर नीट. मग कर घरावर साम्राज्य.’’

दोघांचं ते प्रेमळ भांडण बघून मला किती छान वाटत होतं. प्रिया अगदी नॉर्मल वाटत होती म्हणजे तो आज नसावा…मला थोडं निवांत वाटलं.

एका आठवड्यातच मी घरी निघाले होते. शरद गाडी चालवत होता. प्रियांशु त्याच्या शेजारी होते. प्रिया माझ्या शेजारी होती. अचानक तिनं म्हटलं, ‘‘मला कळलंय, तुला कसला धक्का बसला…का तुला अॅडमिट करावं लागलं. तो माणूस आला होता, ज्याच्यामुळे हे सगळं घडलं.’’

मी दचकून तिच्याकडे बघितलं. प्रियांशुनं मागे वळून बघितलं अन् म्हणाले, ‘‘होय पारूल, तो आला होता. अगं, मला एकदम समजेना काय करावं ते, पण फार बरं झालं तू शरदला सगळं समजावून सांगितलं होतंस अन् ती फाइल कुठं होती ते ही त्याला ठाऊक होतं. त्यानंच प्रियाला ती सारी कागदपत्रं दाखवली. मी प्रियाला सगळी खरी खरी हकीगत सांगितली. या दोघांनी तर त्याला असा काही झापलाय की काय सांगू. माझ्या बहिणीच्या अन् बाबांच्याही आत्म्याला शांती मिळाली असेल.’’

मला आता एकूणच सगळं काही जाणून घ्यायची उत्सुकता वाटत होती. त्याचा सगळा पैसा त्याच्या नालायक मुलांनी उधळला होता. एक कुठंतरी फरार होता. दुसरा भीक मागत होता. त्यानं विचार केला असेल की तुला धाक दाखवून पैसा मिळवता येईल. पण तू तर त्याचा फोन ऐकूनच बेशुद्ध पडलीस, हॉस्पिटलला अॅडमिट करावं लागलं. तो घरी आला तर प्रियाच सामोरी आली. तो विचार करून आला होता की मुलीकडून दर महिन्याला काही पैसे त्याला जीवन जगण्यासाठी मिळावेत. पण शरद आणि प्रियानं ते कागद त्याच्या डोळ्यापुढे नाचवले. प्रियानं तर त्याला धमकावलंच…तू कोण? मी तुझी मुलगी नाही. तू माझा बाप नाही असं कोर्टातून तू लिहून घेतलंस ना? तर मी तुला पैसे का म्हणून द्यायचे? केस आता मी ठोकते तुझ्यावर. तुझ्यामुळे माझी आई इस्पितळात आहे. आमच्या कुटुंबाला तुझ्यामुळे त्रास झालाय. एवढं बोलून प्रिया थांबली नाही. तिनं सरळ एसपीला फोन केला. पोलीस संरक्षण हवंय…ताबडतोब पोलीस आले. त्याला घेऊन गेले. दोन दिवस होता पोलीस कोठडीत.

प्रियानं मला मिठी मारली. ‘‘तुझी मुलगी काही लेचीपेची नाहीए आई. अन् आपलं नातंही तकलादू नाहीए…कुणाच्या धमकीनं ते तुटेल असं तुला वाटलंच कसं? अगं, त्याचा चेहरा अगदी बघण्यासारखा झाला होता…आता कळेल त्याला…उपाशी मरेल तो…’’

माझ्या लेकीला जणू माझा चेहरा वाचता आला. मला आश्वस्त करत म्हणाली, ‘‘आई, काळजी करू नकोस. मी आणि शरदनं मेरठच्या कलेक्टरला फोन करून त्याला वृद्धाश्रमात ठेवण्याची व्यवस्था केली आहे. जोपर्यंत जगेल तोवर त्याला निराश्रित म्हणून पेन्शन मिळेल…अगदी उपाशी अन् रत्यावर नाही राहणार.’’

मी भरल्या डोळ्यांनी, तिच्या सुबुद्धपणाचं कौतुक वाटून तिच्याकडे बघत होते. परत मला बिलगत ती म्हणाली, ‘‘मला या जगात आणण्याचे त्याचे उपकार आहेतच ना? त्याशिवाय मला तुझ्यासारखी आई कशी मिळाली असती? तेच कर्ज फेडलंय मी. आता फक्त कृपा करून मी त्याला भेटायला जाईन किंवा याहून अधिक काही करेन अशी अपेक्षा करू नकोस.’’

मी हसून तिला कुशीत घेतली. घर आलं होतं. गाडी थांबली. प्रियानं मला सांभाळून उतरवून घेतलं अन् आधार देऊन घरात नेऊ लागली. आमचं नातं कागदावर झालं होतं पण ते रक्ताच्या नात्याहून अधिक गाढं अन् मनोज्ञ होतं…जणू जन्मांतरीचं नातं होतं.                             (समाप्त)

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें