पहिल्या मैत्रीणीची आठवण करून देणारे ‘मन जाई’ गाणे प्रदर्शित

* नम्रता पवार

उन्हाळ्याच्या सुट्टीची आणि बालपणातील गोड मैत्रीची आठवण करून देणारा ‘एप्रिल मे ९९’ हा चित्रपट येत्या १६ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बालपणातील आठवणी जागवणाऱ्या या चित्रपटाबद्दल रसिकांमध्ये चांगलीच उत्सुकता निर्माण झाली असतानाच नुकतेच या चित्रपटातील एक गोड, हृदयस्पर्शी गाणे प्रदर्शित झाले असून या गाण्याने प्रेक्षकांच्या मनात पुन्हा एकदा शालेय दिवसांची आणि पहिल्या मैत्रीणीची आठवण जागवली आहे. ‘मन जाई’ असे बोल असणाऱ्या या गाण्याला सोनू निगम यांचा सुरेल आवाज लाभला असून प्रशांत मडपुवार, रोहन प्रधान यांनी शब्दबद्ध केले आहे. तर रोहन -रोहन यांच्या संगीताने हे गाणे अधिकच श्रवणीय बनले आहे.

कृष्णा, प्रसाद आणि सिद्धेश या तिघांची जाईशी होणारी घट्ट मैत्री यात दाखवण्यात आली आहे.

निर्माते राजेश मापुस्कर म्हणतात, “‘एप्रिल मे ९९’ हा एक चित्रपट नाही तर ९० च्या दशकातील प्रत्येकाच्या बालपणाची नाजूक आठवण आहे. आम्ही प्रयत्न केला आहे की, प्रेक्षकांना त्यांच्या बालपणीच्या आयुष्यातील गोड क्षण पुन्हा अनुभवता यावेत. प्रदर्शित झालेले गाणे हे त्या बालमैत्रीचे आणि नकळत्या वयातील भावनांचे प्रतिबिंब आहे. या गाण्याच्या निमित्ताने प्रेक्षकांना आपल्या बालमित्रांची आठवणी नक्की येईल.”

दिग्दर्शक रोहन मापुस्कर म्हणतात,” या गाण्यातून आम्ही त्या निष्पाप भावनांना पकडण्याचा प्रयत्न केला आहे, ज्या वयात मैत्री आणि प्रेम यामधील रेषा फारच धूसर असतात. कृष्णा, प्रसाद, सिद्धेश आणि जाई यांची मैत्री आणि त्यातून नकळत फुलणारी भावना ही प्रत्येकाने अनुभवलेली असते. या गाण्यातून प्रेक्षकवर्ग त्यांचे स्वतःचे बालपण नक्कीच अनुभवतील. ९० व्या दशकाची ही गोड सफर प्रेक्षकांना नक्की आवडेल.”

मापुस्कर ब्रदर्स इन असोसिएशन विथ फिंगर प्रिंट फिल्म्स, नेक्सस अलायन्स, थिंक टँक आणि मॅगीज पिक्चर्स प्रस्तुत ‘एप्रिल मे ९९’ या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन रोहन मापुस्कर यांनी केले असून राजेश मापुस्कर, मधुकर कोटीयन, जोगेश भूटानी , मॉरिस नून हे निर्माते आहेत तर लॉरेन्स डिसोझा सह निर्माते आहेत.

 

‘एप्रिल मे ९९’चा टीझर शेअर करत रितेश देशमुख यांनी दिल्या शुभेच्छा

* नम्रता पवार

लवकरच परीक्षा संपून मुलांच्या शाळांना सुट्टी लागेल. यंदाची उन्हाळ्याची सुट्टी अधिक धमाकेदार करण्यासाठी १६ मे रोजी मापुस्कर ब्रदर्सचा ‘एप्रिल मे ९९’ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तत्पूर्वी या चित्रपटाचे जबरदस्त टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. महाराष्ट्राचे लाडके अभिनेते आणि सर्वांचे भाऊ रितेश देशमुख यांनी आपल्या सोशल मीडियावरून ‘एप्रिल मे ९९’चे टिझर प्रदर्शित करत चित्रपटाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या आहेत.

मापुस्कर ब्रदर्स इन असोसिएशन फिंगर प्रिंट फिल्म्स, नेक्सस अलायन्स, थिंक टँक आणि मॅगीज पिक्चर्स प्रस्तुत ‘एप्रिल मे ९९’ या चित्रपटात मैत्री, तारुण्य आणि उन्हाळ्याच्या सुट्टीतील गोड आठवणींची एक अनोखी गोष्ट पाहायला मिळेल. टीझरमध्ये कोकणातील निसर्गसौंदर्याची सुंदर झलक पाहायला मिळत आहे. तसेच उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचा आनंद लुटणाऱ्या मुलांची मजाही यात दिसतेय. या चित्रपटाच्या पोस्टरने आधीच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली होती, आता टीझरमुळे या चित्रपटाची उत्सुकता अधिकच वाढली आहे. ‘एप्रिल मे ९९’  या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन रोहन मापुस्कर यांनी केले असून राजेश मापुस्कर, मधुकर कोटीयन, जोगेश भूटानी , मॉरिस नून हे निर्माते आहेत तर लॉरेन्स डिसोझा सह निर्माते आहेत.

दिग्दर्शक रोहन मापुस्कर म्हणतात, “मी खूप भाग्यवान आहे. माझ्या पहिल्या चित्रपटासाठी मला माझे प्रेरणास्थान असलेल्या मान्यवरांचा आशीर्वाद मिळतोय. पोस्टरचे अनावरण ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांच्या हस्ते झाले. आता टिझर लाँच रितेश सरांच्या हस्ते. मी रितेश सरांसोबत दोन चित्रपटांसाठी काम केले आहे. हे दोन्ही चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले आहेत. त्यांची एनर्जी आपल्याला ऊर्जा देते. मला त्यांच्यासोबत काम करताना कायमच प्रेरणा मिळते. त्यांच्याकडून शिकण्यासारखे खूप आहे. त्यांच्या हस्ते माझ्या पहिल्या चित्रपटाच्या टीझरचे लाँचिंग होणे, ही आनंदाची बाब आहे. माझ्या कामात मला नेहमीच त्यांचे पाठबळ लाभले असून त्यांच्या प्रेमामुळे आणि त्यांनी केलेल्या सहकार्यामुळे हा क्षण अधिकच खास झाला आहे.’’

निर्माते राजेश मापुस्कर म्हणतात, “ ‘एप्रिल मे ९९’ हा चित्रपट मैत्री, स्वप्न आणि तारुण्यावर आधारित आठवणींना उजाळा देणारा आहे. सर्व वयोगटासाठी असलेला हा चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच नॉस्टेल्जिक बनवेल. तरूणाईलाही तितकाच भावेल. खूप हलकीफुलकी कथा आहे, जी आपल्या अनेक आठवणींना उजाळा देईल.’’

 

 

 

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें