या वस्तू बाथरूममध्ये ठेवणं टाळा

* प्रतिनिधी

तुमचं स्वच्छ बाथरूम पाहून पाहुणेमंडळीही आपली स्तुती केल्याशिवाय राहणार नाहीत आणि त्यांना पुन्हा-पुन्हा तुमच्या घरी यावेसे वाटेल. बाथरूमच्या सजावटीसाठी आपण काही खास उपाय करू शकता. मिक्स अँड मॅचसाठी बाथरूमच सर्वात सुरक्षित जागा आहे. कारण जर काही गडबड झाली, तरी जास्त टेन्शन घेण्याची गरज नाही.

परंतु काही अशा वस्तू आपण बाथरूममध्ये ठेवतो, ज्या बाथरूममध्ये ठेवणे धोकादायक ठरू शकते. या वस्तू खराब होण्याचा धोका तर असतोच, पण त्यांचा आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होण्याची शक्यता असते.

या वस्तू बाथरूममध्ये ठेवणे टाळा :

टूथब्रश

बहुतेक लोक बेसिनजवळ नव्हे, तर बाथरूममध्ये टूथब्रश ठेवतात. मात्र, असे करणे चुकीचे आहे. याची दोन कारणे आहेत. एक म्हणजे, जर तुम्ही तुमच्या टूथब्रशवर कव्हर लावत नसाल, तर त्यांच्यावर टॉयलेटमधील जीवाणूंच्या संक्रमणाचा धोका वाढतो. दुसरे म्हणजे, बाथरूममधील आर्द्रतेमुळे बॅक्टेरिया अगदी सहजपणे आपल्या टूथब्रशवर बस्तान  बसवू शकतात. आपले टूथब्रश एखाद्या काळोख्या जागी ठेवा. मात्र, ३-४ महिन्यांनी टूथब्रश बदलायला विसरू नका.

रेजर ब्लेड

आपल्या घरीही एकापेक्षा जास्त रेजर ब्लेड खरेदी केले जात असतील आणि ते बाथरूममध्येच ठेवले जात असतील, तर सावधान. कारण बाथरूममधील ओलावा रेजर ब्लेडसाठी चांगला नाही. जास्त ओलाव्यामुळे रेजर ब्लेडला गंजही लागू शकतो. रेजर ब्लेड एअर टाइट डब्यात ठेवा आणि तो एखाद्या घरातील कोरडया जागेत ठेवा.

मेकअप प्रॉडक्ट्स

आजकाल लोकांना एवढी घाईगडबड असते की, मेकअप प्रॉडक्ट्सही आता ड्रेसिंग टेबलऐवजी बाथरूममध्ये ठेवले जाऊ लागले आहेत. जर तुम्हीही वेळ वाचविण्यासाठी असे करत असाल, तर लगेच आपले मेकअपचे सामान हटवा. गरमी आणि ओलाव्यामुळे मेकअपचे सामान खराब होते.

मेकअप प्रॉडक्ट्स आपल्या बेडरूममध्येच ठेवा.

औषधं

औषधं ही अनेक लोकांच्या जीवनाचा महत्त्वपूर्ण भाग आहेत. परंतु ती घेणे आपण अनेक वेळा विसरून जातो. लक्षात ठेवण्यासाठी मग ती एखाद्या उपयुक्त जागेत ठेवली जातात. उपयुक्त जागा शोधताना ती जर तुम्ही बाथरूममध्ये ठेवत असाल, तर त्वरित तिथून हटवा. औषधांच्या पॅकेटवर या गोष्टी लिहिलेल्या असतात की, त्यांना तीव्र प्रकाश आणि ओलाव्यापासून दूर ठेवा. बाथरूममध्ये औषधे ठेवल्याने, त्यांचा प्रभाव हळूहळू कमी होतो.

आपण किचनमध्ये औषधे ठेऊ शकता. जर किचनचे कपाट गॅसपासून लांब असेल, तर किचनमध्ये औषधे ठेवा.

टॉवेल

दिवसभराच्या थकव्यानंतर एक रिफ्रेशिंग बाथ आपल्याला ताजंतवानं करते. अंघोळ केल्यानंतर मऊ टॉवेलने स्वत:ला कोरडे करण्याचा अनुभव खूप सुखद असतो. मात्र, अंघोळ केल्यानंतर वापरला जाणारा टॉवेल तुम्ही बाथरूममध्येच ठेवत असाल, तर लगेच त्याची जागा बदला. बाथरूममध्ये टॉवेल ठेवल्यामुळे तो ओलाच राहातो आणि त्याच्यातून दुर्गंधी येऊ लागते.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें