उन्हाळ्यात बाळाची अशी करा देखभाल

* डॉ. कृष्ण याद

नवजात बालकासाठी उन्हाळ्याचा मोसम खूप असह्य असतो; कारण प्रथमच ते या वातावरणाचा सामना करत असतं. मोठ्याने ओक्साबोक्शी रडणं, खूप घाम येणं, केस ओले होणं, गाल लाल होणं आणि वेगाने श्वासोच्छ्वास घेणं यांसारखी लक्षणं या गोष्टींचे संकेत असतात की मुलं अति उकाड्याने त्रासलेली आहेत.

ओवर हीटिंग उन्हाळ्यात डायरियाला थेट कारणीभूत ठरतं, जे अनेक नवजात शिशूंसाठी घातकही ठरू शकतं.

उन्हापासून बचाव

उन्हाळ्याच्या मोसमात बाळाला उन्हाच्या प्रखर किरणांपासून दूर ठेवावं. ६ महिन्यांहून कमी वयाच्या बाळाच्या त्वचेमध्ये सूर्याच्या हानिकारक किरणांपासून सुरक्षा करणारा मेलानिन हा घटक खूप कमी असतो, जो त्वचा, डोळे आणि केसांना रंग प्रदान करतो. मेलानिनच्या अभावामुळे सूर्याची किरणं बाळाच्या त्वचेतील पेशींना कायमस्वरूपी हानी पोहोचवू शकतात.

तेलमालीश करा

बाळाला योग्य तेलमालीश केल्यास बाळाचे टिश्यू आणि मांसपेशी खुलतात आणि यामुळे त्याचा उत्तम विकास होतो. बाळाच्या नाजूक त्वचेला सर्वात चांगल्याप्रकारे सूट करणाऱ्या तेलाची निवड जशी आवश्यक आहे तशीच ही बाबही लक्षात घेणं जरुरी आहे की यामुळे चिकचिकीतपणा जाणवणार नाही, तेलाऐवजी मसाजिंग लोशन आणि क्रीमही वापरता येईल. अंघोळ घालताना ते व्यवस्थित बाळाच्या शरीरावरून स्वच्छ होईल हे बघा. कारण तेल बाळाच्या स्वेदग्रंथीचं कार्य रोखू शकते.

टबमध्ये अंघोळ घालणं

उकाड्यापासून सुटका मिळवण्याचा सर्वोत्तम उपाय आहे अंघोळ करणं. तसं बघता प्रत्येक वेळेस अंघोळ घालण्याऐवजी बाळाला ओल्या कपडाने पुसून घ्यावं. परंतु जेव्हा बाळ उकाड्याने अस्वस्थ होत असेल, तेव्हा त्याला पाण्याने भरलेल्या टबमध्ये अंघोळ घालावी, यात पाण्याचं तापमान कोमट असलं पाहिजे.

टाल्कम पावडर

टबमध्ये अंघोळ घातल्यानंतर मुलांच्या शरीरावर टाल्कम पावडर लावणं चांगलं मानलं जातं. जेथे काही मुलांचं घामोळे कमी करण्यात टाल्कम पावडर उपयुक्त ठरते, तेथे काही वेळा याचा त्रासही होऊ शकतो. तेव्हा आपल्या तळहातावर थोडी पावडर घेऊन बाळाच्या त्वचेवर लावावी, त्याच्यावर पावडर फवारू नये.

नियंत्रित तापमान

बाळाच्या खोलीला दिवसा थंड राखण्यासाठी पडदे लावून खोलीत अंधार करा. पंखा सुरू ठेवा. मुलांना एअरकंडिशनरच्या थेट संपर्कात कधी ठेवू नका; कारण यामुळे बाळाला सर्दीपडसंसुद्धा होऊ शकतं.

उपयुक्त पोशाख

आई बहुतेकदा द्विधा मन:स्थितीत असते की बाळाला कोणते कपडे घालावेत. असा समज आहे की नवजात शिशूला खूप गरम कपड्यांमध्ये ठेवलं पाहिजे. कारण गर्भाच्या तुलनेत बाहेरचं तापमान आतल्या तापमानाहून थंड असतं. परंतु उन्हाळ्याच्या मोसमात त्यांच्या उबदार कपड्यांची संख्या कमी करून त्यांना कमी कपड्यांमध्ये ठेवू शकता. त्यांना सुती सैलसर कपडे घालावेत जेणेकरून त्यांच्या त्वचेला हवेचा स्पर्श होईल आणि त्यांना आरामदेह वाटेल. सुती कपडे मुलांसाठी फायदेशीर असतात आणि हे घामसुद्धा शोषून घेतात. बाळाचं उष्माघातापासून रक्षण करण्यासाठी बाहेर जाताना त्याला हॅट जरूर घालावी.

कसे करावे नवजात बाळाचे स्वागत

* मीरा उगरा

सकाळी सकाळी चांगली बातमी समजली की, आमचे जुने शेजारी खुराना काकांची सून पूनमने मुलीला जन्म दिला. आईने नाश्ता देताना पप्पांना सांगितले की, ‘‘संध्याकाळीच हॉस्पिटलला जाऊन त्यांचे अभिनंदन करू या.’’

पप्पांनी लगेचच तिला नकार देत सांगितले की, ‘‘मुळीच नाही. त्यांना थोडे स्थिरस्थावर व्हायला वेळ द्या.’’

यावरुन थोडा वाद झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी भेटायला जायचे ठरले. मी दुसऱ्या दिवशी फोन करुन हॉस्पिटलला भेटायला जायची वेळ विचारली असता काकांनी सांगितले की, ‘‘ वेळ ठरलेली नाही. प्रसूतीच्या केसेसमध्ये हॉस्पिटलवाले जास्त ताणून धरत नाहीत. तुम्हाला वाटेल त्या वेळेत कधीही या.’’

हे ऐकून थोडे विचित्र वाटले, पण आम्ही उगाच नको त्या वेळी जाण्याऐवजी संध्याकाळी ५ वाजता हॉस्पिटलला पोहोचलो.

रिसेप्शनवर रुम नंबर विचारून तेथे गेलो. मात्र, खोलीत पाऊल टाकताच तेथील दृश्य पाहून आम्हाला तिघांनाही आश्चर्य वाटले. खोलीच्या मध्यभागी पलंगावर पूनम तर पलंगाला लागूनच असलेल्या पाळण्यात मुलगी झोपली होती. त्या दोघींच्या सभोवती पूनमचे आईवडील, बहीण, काकू, त्यांचा मुलगा (बाळाचे वडील), मुलगी आणि आत्ये असे सर्व मिळून गप्पा मारत होते.

हा हॉस्पिटलचा रुम आहे की पार्टीचा हॉल, हेच कळेनासे झाले होते. आई काकूंना भेटली आणि त्यांचे अभिनंदन केले. पूनमच्या डोक्यावरुन हात फिरवला आणि बाळाला दूरूनच आशीर्वाद दिला. मी आणि पप्पांनीदेखील अभिनंदन करुन आनंद व्यक्त केला. त्यानंतर तेथे खाणेपिणे सुरू झाले. आम्ही कसेबसे खाणे संपवतो तोच आणखी एक दाम्पत्य तेथे आले. आम्ही सर्वांचा निरोप घेऊन निघालो.

कारमध्ये बसताच पप्पा रागाने म्हणाले की, ‘‘या…या मिसेसे खुरानांचे डोके फिरले आहे का? आनंद साजरा करायची एवढी काय घाई होती? घाईच होती तर मग बँडबाजा ही बोलवायचा होता. हे सर्व स्वत:ला सुशिक्षित समजतात. तू पूनमकडे पाहिले होतेस का? किती अशक्त दिसत होती ती. बिचारे बाळही थकलेले दिसत होते आणि हे सर्व पार्टी करत होते. हॉस्पिटलवाल्यांना तर काय म्हणायचे? किती कॅज्युअल, किती केअरलेस?’’.

उत्साहाचा त्रास होऊ नये

एखादा नातेवाईक, मित्र किंवा परिचितांच्या घरी बाळ जन्माला आल्याची बातमी समजताच आपण उतावीळपणे अभिनंदन करायला धावत जातो. क्षणभरही हा विचार करीत नाही की, आपल्या जाण्यामुळे त्या व्यक्तीला त्रास होऊ शकतो. त्यामुळे संयम आणि समजूतदारपणे वागा. आई आणि बाळ घरी आल्यानंतर अभिनंदन करायला जा, ते अशाप्रकारे :

*  सर्वात आधी फोन करुन त्यांना सांगा की, तुम्ही १०-१५ दिवसांनंतरच त्यांच्या घरी भेटायला याल, जेणेकरुन तोपर्यंत ते घरी व्यवस्थित स्थिरस्थावर झालेले असतील. बाळाचे झोपणे, जागे राहणे, बिछाना, शी, शू सर्व अनिश्चित असते आणि त्यामुळे घरातील लोकांचा दिनक्रमही बिघडलेला असतो. दोन आठवडयांनंतरच तो हळूहळू रुळावर येतो. ज्या दिवशी तुम्ही भेटायला जाणार असाल त्याच्या एक दिवस आधी त्यांना फोन करुन विचारा की, कोणत्या वेळी येऊ, जेणेकरुन त्यांची गैरसोय होणार नाही.

* नवजात बाळाचे स्वागत करायचे म्हणजे भेटवस्तू देणे गरजेचे आहे. बाळाच्या कुटुंबाशी तुमचे घनिष्ट संबंध असतील तर तुम्ही त्यांना विचारू शकता की, कोणती भेटवस्तू देऊ किंवा एखादी मऊ गादी, टॉवेल किंवा रोजच्या उपयोगातील वस्तू जसे की, बेबी केअर किट वगैरे देऊ शकता.

* तिथे गरजेपेक्षा जास्त वेळ उगाचच बोलत बसू नका. फार तर अर्धा तास बसा. या दरम्यान हलक्याफुलक्या गप्पा मारा. विचारल्याशिवाय उगाचच एखादा सल्ला किंवा निरर्थक गोष्टी उगाळत बसू नका.

* सर्वात महत्त्वाचे म्हणजे जर तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती काही दिवसांपूर्वीच फ्लू, व्हायरल ताप, कावीळ आदी आजारांपासून बरी झाली असेल तर त्या व्यक्तीने आई, बाळाकडे अजिबात जाऊ नये, कारण बरे झाल्यानंतरही संसर्ग दीर्घकाळ राहू शकतो. इतकेच नव्हे तर खोकला, सर्दी झालेल्यांच्या संपर्कात आल्यानेही खोकला, सर्दी होण्याची भीती असते.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें