लाइफ इन सोसायटी

* प्रतिभा अग्निहोत्री

४ दिवसांच्या मुंबईतील ट्रेनिंगची ऑर्डर पाहून नीतू अस्वस्थ झाली. तिचा नवरा नमन ६ महिन्यांच्या ऑफिशिअल टूरसाठी परदेशात गेला होता. घरात वृद्ध सासू-सासऱ्यांना एकटे सोडून कसे जायचे? याचा विचार करुन तिचे डोके दुखू लागले. घरी आल्यानंतरही तिचे कामात लक्ष लागत नव्हते. आम्ही एकटे राहू, तू काळजी करू नकोस, असे सासू-सासरे सांगत होते, तरी त्यांना ४ दिवस एकटे सोडून जाण्यासाठी तिचे मन तयार होत नव्हते.

संध्याकाळी सोसायटीच्या पार्कमध्ये समोरच्या फ्लॅटमध्ये राहणारी तिची मैत्रीण नीनाने नीतूला असे अस्वस्थ पाहून विचारले की, ‘‘काय झाले? आज चेहऱ्यावर असे १२ का वाजले आहेत?’’

सुरुवातीला नीतूने काहीही सांगितले नाही. पण नीना सतत विचारू लागल्याने तिने मुंबईला ट्रेनिंगसाठी जायचे असल्याचे सांगितले. हे ऐकल्यानंतर नीनाने हसतच सांगितले की, ‘‘अगं यात काळजी करण्याचे किंवा अस्वस्थ होण्याचे काय कारण आहे? मी समोरच तर राहते. काका-काकूंना काहीच त्रास होऊ देणार नाही. मी स्वत: येऊन त्यांची काळजी घेईन. पण तरीही तू माझा फोन नंबर त्यांना दे, म्हणजे त्यांना अचानक गरज पडली तरी ते लगेचच मला बोलावून घेतील.’’

नीनाचे बोलणे ऐकल्यानंतर नीतूला हायसे वाटले. त्यानंतर ती आनंदाने म्हणाली की, ‘‘नीना तू तर माझी अडचण चुटकीसरशी सोडवलीस. मला तर सकाळी ऑर्डर मिळताच टेन्शन आले होते. मागच्या वेळेला आजारी पडल्यामुळे ट्रेनिंगला जाऊ शकले नव्हते. त्यामुळे आता नकारही देऊ शकत नव्हते.’’

दुसऱ्याच दिवशी नीनाच्या विश्वासावर सासू-सासऱ्यांना सोडून नीतू मुंबईला गेली. परत आली तेव्हा सासू-सासऱ्यांनी नीनाचे खूप कौतुक केले. ते ऐकून नीतूला बरे वाटले. तिला २ वर्षांपूर्वीचा घटनाक्रम आठवला जेव्हा ती फ्लॅटऐवजी स्वत:चे स्वतंत्र मोठे घर घेण्याच्या विचारात होती. तर नमनला फ्लॅट घ्यायचा होता, कारण तिथे आजूबाजूला शेजारी असतात. ते मदतीला धावून येतात. याउलट स्वतंत्र घरात महिनोन महिने एका शेजाऱ्याचे दुसऱ्या शेजाऱ्याला दर्शन घडत नाही,असे त्याचे म्हणणे होते.

सभ्य शेजारपाजार

रानूचा फ्लॅट तिच्यासाठी वरदानच ठरला. काही वर्षांपूर्वी तिने व तिच्या पतीने साठवलेल्या पैशांतून एका सोसायटीत फ्लॅट घेतला होता. सासूच्या मृत्यूनंतर तिचे वृद्ध सासरेही त्यांच्यासोबतच राहत होते.

सकाळी १० वाजता पतीपत्नी दोघेही ऑफीसला जात आणि संध्याकाळी परत येत. तिचे सासरे दिवसभर त्यांच्या कामात मग्न असायचे आणि संध्याकाळी सोसायटीच्या पार्कमध्ये फिरायला जायचे. तिथे समवयस्क मित्रांसोबत गप्पा मारताना वेळ कसा निघून जात असे, हे त्यांनाही कळत नसे. वर्षभरानंतर रानूची कानपूरहून अलाहाबादला बदली झाली.

अमन गोंधळून गेला. घर आणि वडिलांना एकटयाने सांभाळणे त्याच्यासाठी अवघड होते. रानूची एवढी चांगली सरकारी नोकरीही तिला सोडायला लावणे योग्य नव्हते. कसेबसे आठवडाभरासाठी घर मॅनेज करुन रानू अलाहाबादला निघून गेली.

एका आठवडयानंतर जेव्हा ती वीकेंडला घरी आली तेव्हा हे ऐकून तिला आश्चर्य वाटले की, रानू बाहेर जाणार असल्याचे समजताच तिच्या सासऱ्यांचे आजूबाजूला राहणारे सर्व मित्र त्यांच्या मदतीला धावून आले. घरात जेवण, नाश्ता काहीच बनवू दिले नाही. नंतर रानूने हळूहळू तिच्या कामावरच्यांना प्रशिक्षण दिले आणि कसेबसे वर्षभर काम केल्यानंतर कानपूरला बदली करुन घेतली.

रानू तिच्या शेजाऱ्यांचे कौतुक करताना थकत नाही. ती सांगते, ‘‘मी वीकेंडलाच येऊ शकत होते. पण यादरम्यान माझ्या सर्व शेजाऱ्यांनी माझे घर एवढया चांगल्या प्रकारे सांभाळले की, त्यांच्यामुळेच मी अलाहाबादला १ वर्ष काढू शकले. याशिवाय आमच्या सोसायटीत प्रत्येक प्रकारच्या सुविधा आहेत. त्यामुळे मी नसताना माझे सासरे आणि पती दोघांनाही घर मॅनेज करताना कोणतीच अडचण आली नाही.’’

गरज पडताच मिळते मदत

बँकेत काम करणाऱ्या अनिताचा सोसायटीबाबतचा अनुभव वेगळाच आहे. त्या सांगतात, त्यांच्यासोबत त्यांची सासूही राहत होती. पतीची बदली दुसऱ्या शहरात झाली होती. एकुलती एक मुलगीही अन्य शहरात इंजिनीअरिंग करत होती.

एके दिवशी मोलकरणीकडून काम करुन घेताना त्यांच्या सासूचा पाया घसरला आणि खाली कोसळून त्या बेशुद्ध पडल्या. त्यांच्या समोरच्या फ्लॅटमध्ये राहणाऱ्या तनुला हे समजताच त्या त्यांना हॉस्पिटलला घेऊन गेल्या. अनिता हॉस्पिटलला पोहोचेपर्यंत त्यांनी उपचार सुरू केले होते. या घटनेला दोन वर्षे झाली, पण आजही आपल्या सासूला वेळेवर मदत करणाऱ्या शेजाऱ्यांचे अनिता मनापासून आभार मानतात.

एके दिवशी अस्मिताचे पती जेव्हा सकाळी झोपून उठले तेव्हा त्यांना काहीसे अस्वस्थ वाटू लागले. काही वेळातच त्यांना चक्कर आली. घाबरलेल्या अस्मिताने शेजारी राहणाऱ्या राजेंद्रजींना याबाबत सांगताच, ते त्वरित त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. ताबडतोब उपचार झाल्यामुळे त्यांचा जीव वाचला. अस्मिता यांनी सांगितले की, ‘‘मी ७ दिवस हॉस्पिटलमध्येच होते. घरात माझी वृद्ध सासू आणि १२ वर्षीय मुलगा होता. त्या दोघांनाही माझ्या शेजाऱ्यांनीच सांभाळले. मी प्रत्येकालाच सांगेन की, फ्लॅटमध्येच राहणे सुरक्षित आहे. कमीत कमी आजूबाजूला कोणीतरी विचारपूस करणारा असतो.’’

सोसायटीतील फ्लॅटला प्राधान्य

पूर्वी लोकांना स्वतंत्र घर आवडायचे. कारण तेथे त्यांना जमीन आणि छत दोन्ही सोयी मिळत होत्या. मात्र आता लोक सोसायटीतील घरात राहण्यास प्राधान्य देत आहेत. यामागची कारणे पुढीलप्रमाणे :

* आजकाल पतीपत्नी दोघेही नोकरीला जातात. अशावेळी घरी उरतात ते वृद्ध किंवा मुले. अनेकदा संपूर्ण दिवस त्यांना एकटे रहावे लागते. बँक कर्मचारी रागिणी आणि त्यांचे पती संध्याकाळी घरी येतात. पण त्यांची दोन्ही मुले दुपारी चार वाजताच शाळेतून घरी येतात. त्यांच्या शेजारी एक जोडपे राहते. त्यांची मुले परदेशात राहतात. रागिणी आणि त्यांचे पती येईपर्यंत हे जोडपे त्यांच्या मुलांना सांभाळते. यामुळे त्यांचाही वेळ चांगला जातो आणि रागिणी यांनाही मुलांची चिंता वाटत नाही.

* सोसायटीत एकाच परिसरात अनेक घरे असतात. यामुळे कुठल्या ना कुठल्या शेजाऱ्याशी तुमचे चांगले संबंध प्रस्थापित होतात. जे संकटसमयी तुमच्यासाठी धावून येतात.

* आजकाल सोसायटीचे लुकही अत्याधुनिक झाले आहे. तिथे जिम, क्लब, पार्टी, हॉल, गार्डन, लायब्ररी तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रही असते.

* जागतिकीकरणाच्या आजच्या युगात मुले देशातच नाहीत, तर परदेशातही नोकरीसाठी जातात. अशावेळी अनेकदा आईवडिलांना त्यांच्यासोबत जावेच लागते. जिथे स्वतंत्र घरामध्ये चोरीची भीत असते तिथे सोसायटीत सुरक्षारक्षक तसेच लोकांची ये-जा असल्याने अशा प्रकारची कोणतीच भीती नसते.

* सोसायटी आपल्या परिसरात राहणाऱ्यांना दरमहा थोडेसे शुल्क आकारते, ज्यातून वेळोवेळी सोसायटीची देखभाल-दुरुस्ती केली जाते. ठराविक शुल्क दिल्यानंतर तुम्हाला कसलीच काळजी उरत नाही. याउलट स्वतंत्र घरात एखादी समस्या आल्यास तुम्हालाच ती सोडवावी लागते आणि वृद्धावस्थेत तुमच्यासाठी ती खूप मोठी समस्या ठरते.

* सोसायटीत विविध संस्कृतीचे लोक राहतात. यामुळे देशातील विभिन्न संस्कृतीशीही तुमची ओळख होते. संपूर्ण सोसायटीतील रहिवासी एकत्र येऊन सण साजरे करतात. मात्र स्वतंत्र घरात राहिल्यास सण आला कधी आणि निघून गेला कधी, हेही कळत नाही.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें