अपंग

कथा *  रवी चांदोरकर

मुंबई विमानतळावर एअर इंडियाचं विमान उभं होतं. मुंबईहून दिल्लीला जाणारी फ्लाइट होती. सगळ्या सीट्स भरलेल्याच होत्या. स्वातीनं गौरवबरोबर विमानात प्रवेश केला. गौरव व्हीलचेअरवर होता. एअरहोस्टेस व्हीलचेअर ढकलत होती. स्वाती तिला मदत करत होती. गोरापान, देखणा गौरव त्रासल्यासारखा दिसत होता.

स्वातीनं एअरहोस्टेसच्या मदतीने गौरवला सीटवर नीट बसवलं. एअरहोस्टेसला धन्यवाद दिले अन् हातातलं सामान वरच्या रॅकवर ठेवून ती आपल्या सीटवर बसली. तेवढ्यात विमानात प्रवेश करणाऱ्या जोडीकडे तिचं लक्ष गेलं. तो अनंत होता. त्याच्याबरोबर नवपरिणीत वाटणारी एक सुंदर मुलगी होती. मुख्य म्हणजे अनंत व्यवस्थित चालत होता. दोघंही खूप आनंदात दिसत होती. स्वातीनं आपला चेहरा मॅगिझनच्या आड लपवला. तिला अनंतकडे बघण्याचं धाडस होत नव्हतं. ती दोघं स्वातीच्या सीटच्या दोन सीट मागे जाऊन आपल्या आसनावर बसली

स्वातीला घेरी आल्यासारखं वाटलं. तिनं गौरवच्या हातावर हात ठेवला.

‘‘काय झालं स्वाती? बरं वाटत नाहीए का?’’ गौरवनं विचारलं.

स्वातीनं उत्तर दिलं नाही, तेव्हा गौरवनं पुन्हा विचारलं, ‘‘काय होतंय? बरी आहेस ना?’’

‘‘हो…हो, आता बरं वाटतंय. एकदम घेरी आल्यासारखं झालं मघाशी,’’ स्वातीनं स्वत:ला सावरून उत्तर दिलं.

स्वातीचं ग्रॅज्यूएशन होता होताच तिचं अनंतशी लग्न झालं होतं. दिसायला अतिशय सुंदर, अभ्यासात हुशार अन् वागायला अत्यंत गुणी असलेली स्वाती सगळ्यांची लाडकी होती.

सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातल्या पाच बहिणींपैकी स्वाती सर्वात धाकटी. ती बी.ए. फायनलला असतानाच वडील वारले. चार पोरी उजवता उजवता वडिल तरूण वयातच म्हातारे दिसायला लागले होते. इकडून तिकडून कर्ज घेत कशीबशी चार पोरींची लग्नं केली अन् हार्ट अटॅक येऊन स्वातीच्या लग्नाआधीच जग सोडून गेले. निरक्षर, गरीब घरातली मुलगी असलेली स्वातीची आई या धक्क्यानं अंथरूणाला खिळली. चारही बहिणींना काळजी पडली की बाबांपाठोपाठ आईही या जगातून गेली तर स्वातीचं कसं होणार? तिला कोण बघेल? कारण या चौघीही तशा सामान्य कुटुंबातच दिल्या गेल्या होत्या. त्यांनी ठरवलं स्वातीचं लग्न लवकरात लवकर करायचं.

मुलं बघायची मोहीम सुरू झाली. पण वडील वारलेले, भाऊ नाहीच हे ऐकून अनेक स्थळं मुलगी न बघताच नकार द्यायची. कुणाला मुलगी पसंत पडली तरी देण्याघेण्यावरुन बोलणी फिसकटायची.

लग्नात खर्च करायला आईकडे कुठं पैसा होता? बहिणीही गरीबीतच राहात होत्या. त्या तरी उचलून काय मदत करणार होत्या?

स्वाती त्यांची समजूत घालायची, ‘‘तुम्ही माझ्या लग्नाचं टेन्शन घेऊ नका, होईल माझं लग्न.’’

एकदा स्वातीसाठी मुंबईतल्या एका फार मोठ्या उद्योगपतींच्या घरातून स्थळ आलं. नात्यातल्या एकानं हे स्थळ सुचवलं होतं.

‘‘मावशी, खूप छान स्थळ आहे. स्वाती राज्य करेल त्या घरात. पैसा अडका, मोटारी, नोकर चाकर आलिशान बंगला…’’ स्वातीचा चेहरा उजळला.

‘‘पण सुशांत, अरे ती एवढी बडी माणसं, आम्ही गरीब…’’

‘‘मावशी, त्यांना फक्त हुशार अन् समजून घेणारी मुलगी हवी आहे. मुलात थोडा दोष आहे.’’

‘‘म्हणजे काय?’’

‘‘लहानपणी त्याला काही आजार झाला होता. त्यात एक पाय अधू झालाय. पण ती पैसेवाली माणसं आहेत. लवकरच अमेरिकेला जाऊन उपचार करून घेणार आहेत.’’

‘‘पण पाय होईल ना चांगला?’’ आईनं काळजीनं विचारलं.

‘‘होय मावशी. अमेरिकेतल्या निष्णात डॉक्टरशी बोलणी सुरू आहेत त्यांची.’’

‘‘तरीही मला जरा…’’

‘‘मावशी, स्वाती माझी बहीण आहे. अयोग्य व्यक्ती मी माझ्या बहिणीसाठी सुचवेन का? अनंतला बघशील तर तू ही त्याच्या प्रेमात पडशील. दिसायला तो चांगलाच आहे. वर पुन्हा श्रीमंतीचं, बुद्धीचं, शिक्षणांचं तेज…तो चालत नाही तोवर कुणाला त्याचा दोष कळतसुद्धा नाही.’’

शेवटी सुशांतने मावशीचं व तिच्या पाचही मुलींचं मन वळवलं. स्वातीला प्रथम, पायानं अधू असलेला अनंत पसंत नव्हता. पण आपल्या गरीबीचं रडगाणं पुन्हा पुन्हा गाऊन बहिणींनी तिलाही राजी केलं.

लग्न मुंबईतच खूप थाटात झालं. स्वातीची आई, चारही बहिणी, त्यांचे नवरे, मुलं सर्वांना छान आहेर मिळाले. मुंबई हिंडवून आणली. स्वातीच्या घरून त्यांनी एक पैसाही घेतला नाही. सगळेच लोक खुश होते.

स्वातीला तर ते वैभव बघून घेरीच आली. सासूसासरे तिची खूप काळजी घ्यायचे. तिच्यावर खूप माया करायचे.

अनंतचा एक पाय आजारपणांत अधू झाल्यामुळे त्याला कुबडी घ्यावी लागे. प्रथम स्वातीला त्याच्याबरोबर बाहेर पडायची लाज वाटायची. पण मग तिनं स्वत:ला बजावलं, इतकं प्रेम करणारा नवरा भेटलाय, त्याचं आपण आधार व्हायचं. त्याला काही कमी पडू द्यायचं नाही. त्यानंतर तिला अनंतची कधीच लाज वाटली नाही. सगळा देश ती अनंतबरोबर फिरली. मुंबईत होणाऱ्या अनेक कार्यक्रमांत ती अनंतबरोबर जायची. कार्यक्रम एन्जॉय करायची.

एकदा क्लबच्या एका कार्यक्रमानंतर ती अनंतचा हात धरून बाहेर येत असताना स्वातीला अचानक गौरव दिसला. तिच्याबरोबर तो कॉलेजात होता. स्मार्ट अन् देखणा तरूण होता तो.

‘‘हॅलो गौरव,’’ स्वातीनं त्याला हाक मारली.

‘‘हाय स्वाती, कशी आहेस? कुठं असतेस हल्ली?’’ गौरवनं तिच्या जवळ येत विचारलं.

‘‘इथंच असते मुंबईत. लग्न झालं माझं. दोन वर्षं झालीत.’’

‘‘अरेच्चा? दोन वर्षं झालीत?’’ आश्चर्यानं गौरव बघतंच राहिला.

‘‘हे माझे पती अनंत.’’ स्वातीनं ओळख करून दिली.

‘‘नमस्कार, मी गौरव,’’ गौरवनं हात पुढे केला.

‘‘नमस्कार, मी अनंत,’’ त्याच हात हातात घेऊन हस्तांदोलन करत अनंत म्हणाला.

त्याच्या अधू पायाकडे गौरवचं लक्ष गेलं. त्यानं प्रश्नार्थक नजरेनं स्वातीकडे बघितलं.

स्वातीनं त्याची खबरबात विचारली तेव्हा तो म्हणाला, हल्लीच तो दिल्लीहून मुंबईत शिफ्ट झालाय. एका मल्टीनॅशनल कंपनीत उच्चपदावर आहे. अजून लग्न केलं नाहीए. स्वातीनं त्याला घरी येण्याचं आमंत्रण दिलं. एकमेकांच्या मोबाईल नंबर्सची देवाण घेवाण झाली अन् ते आपापल्या घरी गेले.

त्या रात्री गौरवला झोप आली नाही. तो कॉलेजच्या दिवसांपासून स्वातीवर प्रेम करत होता, पण त्या वयात प्रेमाचा उच्चार करायला घाबरत होता.

स्वातीने अशा अपंग माणसाशी लग्न का केलं असेल? ती खरोखर सुखात आहे की वरवर आनंदी दिसते? अनेक प्रश्न त्याच्या डोक्यात पिंगा घालत होते. स्वातीला याबाबतीत एकदा विचारावं असं त्यानं ठरवलं.

त्यानं एक दिवस स्वातीला फोन केला अन् ‘केव्हा भेटूयात’ असं विचारलं. स्वाती म्हणाली, ‘‘उद्या मी मार्केटला जाते आहे तेव्हा तिथंच आपण भेटूयात.’’

मार्केटमधल्या कॉफी शॉपमध्ये दोघं भेटली. स्वातीनं तिच्या लग्ना आधीची अन् मग लग्न ठरल्यानंतर, लग्न झाल्यानंतरची सर्व हकिगत गौरवला सांगितली.

अनंत बरोबर ती आनंदात आहे. सासू सासरे, इतर नातलग तिच्यावर किती माया करतात शिवाय अनंतचा कोट्यवधींचा टर्न ओव्हरचा बिझनेसही ती बघतेय वगैरे अनेक गोष्टी गौरवला सांगितल्या.

स्वातीच्या गरीबीमुळेच तिला ही तडजोड करावी लागली असली तरी ती आता अगदी सुखात आहे हे बघून गौरवला आश्चर्य वाटलं.

त्यादिवशी तिला परतून यायला नेहमीपेक्षा जास्त वेळ लागला. तिनं ड्रायव्हलाही सोबत नेलं नव्हतं. त्यामुळे अनंतला खूपच काळजी वाटली. अनंत तिला मोबाइलवर फोन लावत होता. पण गाडी ड्राइव्ह करत असल्यामुळे स्वातीनं फोन उचलला नाही.

घरी आल्यावर अनंतची क्षमा मागून स्वाती म्हणाली, ‘‘अनंत, तुमची स्वाती आता मुंबईकर झाली आहे. पूर्वीसारखी घरगुती, घाबरट स्वाती नाहीए ती.’’

गौरवशी स्वातीच्या भेटी वाढल्या. गौरव घरीही येऊन गेला. अनंतनं त्याला मित्रासारखीच वागणूक दिली. गौरव अन् स्वाती एकत्र सिनेमाला, हॉटेललाही जाऊ लागली. त्यांच्यातली जवळीक वाढू लागली. गौरवचं आकर्षण स्वातीला त्याच्याकडे ओढत होतं अन् तिच्याही नकळत ती अनंतपासून दुरावरत होती.

स्वाती अन् अनंतच्या लग्नाला पाच वर्षं झाली होती. पण अजून त्यांना मूळबाळ नव्हतं. स्वातीला आता गौरवच अधिक जवळचा वाटत होता. त्याच्याबरोबर संसार थाटायची स्वप्नं ती बघत होती.

अनंत पायानं अधू असला तरी हुशार अन् कर्तबगार होता. स्वातीवर त्याचं खूपच प्रेम होतं. तिनं त्याला आपलं म्हटलं, त्याला भारतदर्शन घडवलं याबद्दल तो तिचा कृतज्ञ होता. तो तिला म्हणायचा, ‘‘माझे पाय बरे झाले की मी तुला जगप्रवासाला नेईन, थोडी कळ काढ.’’

पण आता स्वातीमध्ये झालेला बदल त्याला जाणवत होता. स्वातीला तो काही म्हणत नव्हता, पण स्वातीचं ऑफिसमधून बराच वेळ बाहेर असणं, ऑफिसच्या कामाकडे दुर्लक्ष, घरी उशिरा अवेळी येणं, सगळ्यांनाच खटकत होतं.

अनंतच्या आईबाबांनी अत्यंत सौम्यपणे स्वातीला या बाबतीत विचारलं, तेव्हा तिनं आपण ऑफिसच्या कामानं बाहेर जातो किंवा मैत्रिणींकडे भिशी, किटी असते म्हणून जातो असं सांगून वेळ मारून नेली.

अनंतच्या बाबांचा मात्र तिच्या बोलण्यावर विश्वास बसेना. त्यांनी एका खाजगी गुप्तहेराला स्वातीवर नजर ठेवायला सांगितलं. त्यानं काढलेली माहिती धक्कादायक होती. स्वातीचा सगळा वेळ गौरवच्या सोबतीत जात होता. तिनं एका पंचतारांकित हॉटेलात एक खोलीही बुक करून ठेवली होती. नेहमी ती दोघं तिथंच भेटायची.

दोनचार दिवसातच डिटेक्टिव्हनं सूचना दिली की स्वाती आणि गौरव हॉटेलात आहेत. अनंतचे आईबाबा ताबडतोब तिकडे गेले.

बाबांनी खोलीची बेल वाजवली. गौरवला वाटलं, वेटर असेल म्हणून त्यानं दार उघडलं. दारात त्या दोघांना बघून तो एकदम गांगरला. त्याच्या पायाखालची जमीन सरकली. ‘‘तू…तुम्ही?’’ कसा बसा बोलला.

‘‘नालायक, कृतघ्न माणूस…बाजूला हो.’’ बाबांनी त्याला खोलीत ढकललं अन् ते आत आले. खोलीत बेडवर स्वाती झोपलेली होती. संतापलेल्या सासूसासऱ्यांना अवचित असं समोर बघून ती धडपडून उठून बसली.

‘‘स्वाती काय चाललंय हे?’’ सासूनं दरडावून विचारलं. स्वाती खाली मान घालून उभी होती.

‘‘तुझे इतके लाड केले. कार ड्रायव्हिंग शिकवलं, धंद्यात तुला पार्टनर केलं, पैसा भरपूर दिला, स्वातंत्र्य दिलं त्याची अशी शिक्षा देते आहेस आम्हाला?’’ सासरे गरजले.

‘‘होय, हेच सत्य आहे. सगळं आयुष्य मी तुमच्या अपंग मुलाबरोबर नाही काढू शकणार. मला सुदृढ जोडीदार हवाय. कुठवर मी सहन करू?’’ एकाएकी स्वातीनंही रूद्रावतार धारण केला.

‘‘तर मग राहा याच्याच बरोबर. यापुढे आमच्या घरात तुला जागा नाही.’’ सासूनं म्हटलं. सासूसासरे तिथून तडक घरी पोहोचले.

घरी जाऊन त्यांनी अनंतलाही सांगितलं. रात्री स्वाती घरी आली. ‘‘आता माझ्या आयुष्यात तुला स्थान नाही,’’ अनंतनं म्हटलं.

दुसऱ्याच दिवशी अनंतच्या नावांनं एक चिठ्ठी लिहून ठेवून स्वातीनं घर सोडलं.

‘‘गौरवबरोबर जाते आहे. तुम्ही दिलेल्या प्रेम, आदर. पैसा, स्वातंत्र्य व सर्वच गोष्टींसाठी आभारी आहे. माझा शोध घेऊ नका.’’

स्वाती घर सोडून गेल्यावर सासऱ्यांनी पुन्हा व्यवसायात लक्ष घातलं. मधल्या काळात त्यांनी अनेक गोष्टी स्वातीवर सोपवल्या होत्या. जे वास्तव समोर आलं ते धक्कादायक होतं. हॉटेलची लाखो रूपयांची बिलं दिली गेली होती. एक कोटीपेक्षा जास्त रोख रक्कम व पन्नास हजारांचे दागिने बँकेतून काढले गेले होते. स्वाती असा विश्वासघात करेल याची त्यांनी स्वप्नांतही कल्पना केली नव्हती. एवढ्या मोठ्या खानदानी कुटुंबातली लाडकी सून असा दगा देऊन प्रियकरासोबत निघून गेली होती.

काळासारखं औषध नाही म्हणतात. हळूहळू अनंत व त्याच्या घरचे लोक सावरले. व्यवसायानं अधिक जोम धरला. बऱ्यांपैकी स्थिरस्थावर होतंय म्हणेपर्यंत एक धक्का अजून बसला. स्वातीनं वकीलांमार्फत घटस्फोटाची नोटीस पाठवली होती. दहा कोटींची मागणी केली होती. तिच्या लोभीपणाला मर्यादा नव्हती. आधीच एक कोटी कॅश अन् पन्नास हजारांचे दागिने नेले होते. लाखो रूपये हॉटेलवर खर्च केले होते आणि आता हे दहा कोटी, पण शेवटी नावाचा, नामांकित घराण्याच्या इभ्रतीचा प्रश्न होता. अनंतनं व त्याच्या आईबाबांनी निर्णय घेतला की परस्पर संमतीनं घटस्फोट अन् पोटगी म्हणून आठ कोटी रुपये देऊन ही ब्याद आयुष्यातून कायमची घालवावी.

आठ कोटी रुपये घेऊन स्वातीनं अनंतला घटस्फोट दिला. तिनं गौरवशी लग्न केलं.

ती आनंदात होती. भरपूर पैसा होता. चैन चालली होती. हातात फुकटचा पैसा आल्यानं गौरवनंही नोकरी सोडून धंदा सुरू केला होता. पार्ट्या, सट्टा, दारू, यात भसाभस पैसा संपत होता.

त्यातच एक अपघात घडला. गौरव बाइकवरून खाली पडला अन् मागून येणारी बस त्याच्या पायांवरून गेली. पायांचा पार भुगा झाला.

स्वातीला कुणीतरी कळवलं. ती धावत हॉस्पिटलमध्ये पोहोचली. गौरवचे काही मित्रही आले होते. डॉक्टरांच्या टीमनं स्वातीला सांगितलं की गुडघ्याखाली त्यांचे पाय कापावेच लागतील. ऐकून स्वाती स्तब्ध झाली.

नोकरी गेलेली. मन:पूत खर्च केल्यानं पैशांची चणचणच निर्माण झालेली. दोन्ही पाय गेल्यामुळे गौरव खूप चिडचिडा झाला होता. त्याला वाटे स्वातीनं सतत त्याच्या जवळ राहावं. त्याला जुने दिवस आठवायचे…जेव्हा तो धडधाकट होता तेव्हा स्वाती अनंतला सोडून त्याला भेटायला यायची. आता तो अपंग होता. अनंतला निदान आधार द्यायला आईवडिल, व्यवसाय, अफाट संपत्ती होती. गौरवकडे तर काहीच नव्हतं. जरा स्वाती इकडे तिकडे गेली की तो घाबरा व्हायचा. ‘‘कुणाकडे गेली होतीस, कशाला गेली होतीस,’’ तो तिच्यावर ओरडायचा.

स्वातीला वाईट वाटायचं. तिच्या केलेल्या चुकांची शिक्षा ती भोगत होती. तिला अनंतची आठवण यायची. पण आता काय उपयोग होता?

गौरवच्या उपचारांवर फार पैसा खर्च झाला होता. आता मुंबईत राहाणं अवघड होतं. दिल्लीला परत जाऊन तिथं काहीतरी व्यवसाय करावा असा निर्णय त्यांनी घेतला. दिल्लीला काही जुने मित्र होते. त्यांनी आधार द्यायची तयारी दाखवली.

दिल्लीला जाण्यासाठी स्वाती व्हीलचेअरवरून गौरवला घेऊन विमानतळावर आली होती. तिचा भूतकाळ तिच्या चुकीनं तिनं उद्ध्वस्त केला होता. जे आता हातात होतं, ते तिला घालवायचं नव्हतं.

‘‘एक्सक्यूज मी मॅडम, तुम्ही बेल्ट बांधायला विसरलात.’’ एअरहोस्टेसनं स्वातीला म्हटलं.

‘‘थँक्यू,’’ स्वातीनं म्हटलं. तिनं मागे वळून बघितलं. अनंत आपल्या सीटवर शांतपणे बसला होता. चेहऱ्यावर प्रसन्न हास्य होतं. त्याची बायको त्यांच्या खांद्यावर डोकं टेकवून झोपी गेली होती.

स्वातीला वाटत होतं आज ती स्वत:च अपंग झाली आहे.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें