महिला दिन विशेष

आभा दमानी संचालक, आयसीपीए

* गरिमा पंकज

४५ वर्षीय आभा दमानी हे एक असे व्यक्तिमत्त्व आहे, ज्यांनी आपली कंपनी आईसीपीए हेल्थ प्रोडक्ट्स लिमिटेडला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून दिली. सुमारे ५० वर्षांपूर्वी त्यांच्या वडिलांनी (जे एक फार्मासिस्ट होते) या कंपनीची स्थापना केली होती. अंकलेश्वर, गुजरात येथे सुरू करण्यात आलेल्या या कंपनीशी आभा २२ वर्षांपूर्वी जोडल्या गेल्या आणि या कंपनीला त्यांनी नवीन उंचीवर नेले. आभा दमानी यांचे पती व्यावसायिक आहेत. त्यांना ९ वर्षांचा मुलगा आहे. कुटुंब चांगल्या प्रकारे सांभाळत त्या त्यांच्या कामाप्रतीही पूर्णपणे समर्पित आहेत.

त्यांची कंपनी आईसीपीएचे दंत, त्वचा, इएनटी म्हणजे नाक, कान, घसा, हर्बल उत्पादनांमध्ये स्पेशलायझेशन म्हणजे विशेषीकरण आहे. ही उत्पादने विशेषत: दंतवैद्य, ऑन्कोलॉजिस्ट, ईएनटी विशेषज्ञ आणि त्वचा शास्त्रज्ञांमध्ये खूपच लोकप्रिय आहेत. पोस्ट केमो ओरल इन्फेक्शन टाळण्यासाठी ऑन्कोलॉजिस्टही घेण्याचा सल्ला देतात.

आभा दमानी या कंपनीशी जोडल्या गेल्या तेव्हापासून कंपनीची उलाढाल आता १० पटीने वाढली आहे. त्यांनी एक मॅन्युफॅक्चरिंग म्हणजेच उत्पादनाचे युनिट तयार केले आहे, त्यांच्या या प्लांटला अनेक आंतरराष्ट्रीय प्राधिकरणांनी मान्यता दिली आणि त्यानंतर कंपनीने जागतिक बाजारपेठेत प्रवेश केला. आज आईसीपीए ऑस्ट्रेलिया, यूके, मध्य पूर्व, आफ्रिका, दक्षिण पूर्व यासह ३५ देशांमध्ये आपली उत्पादने निर्यात करते. कंपनीमध्ये सुमारे ८०० कर्मचारी काम करतात, त्यापैकी ५०० मार्केटिंग म्हणजेच विपणन क्षेत्रात आहेत, एकूण कर्मचाऱ्यांपैकी सुमारे १००-१५० महिला कर्मचारी आहेत. मार्केटिंगमध्ये महिला कमी आहेत, पण प्लांट आणि कार्यालयात महिलांची संख्या जास्त आहे.

एक यशस्वी महिला उद्योजक होण्यासाठी महिलांमध्ये कोणती वैशिष्ट्ये असायला हवीत?

महिलांनी त्यांच्या कामात लक्ष केंद्रित केले पाहिजे, त्यांनी संसार आणि कुटुंबासह कार्यालयीन कामात पूर्ण लक्ष देणे आवश्यक आहे. महिलांनी संयम राखणेही महत्त्वाचे आहे, कारण कधीकधी परिस्थिती आपल्या नियंत्रणात नसते. त्यावेळी संयम गमावून चालत नाही. याशिवाय महिलांनी निराश होऊ नये. अनेकदा लोक म्हणतील की, तुम्ही महिला आहात, त्यामुळे तुम्हाला जमणार नाही, पण तुम्हाला ते करुन दाखवावेच लागेल, कारण तुम्ही भांडलात किंवा रागाने बोललात तर काहीही होणार नाही, पण जेव्हा तुम्ही धीर धरून चांगले काम केले तरच तुम्हाला स्वीकारले जाईल आणि तुमचा आदर केला जाईल. तुम्ही कधीही हार मानू नका.

समाजात महिलांच्या स्थितीबद्दल काय सांगाल? ती सुधारणे कसे शक्य आहे?

महिलांच्या स्थितीत बरेच बदल झाले आहेत. आता लोक सर्वत्र महिलांना स्वीकारू लागले आहेत. महिलांमध्ये जागृती येत आहे. प्रत्येक क्षेत्रात त्यांचे ज्ञान तर वाढलेच आहे, सोबतच त्यांच्यावर कामाचा ताणही वाढला आहे. आधी समाजात महिला-पुरुषांच्या भूमिका, त्यांच्या जबाबदाऱ्या स्पष्ट होत्या, पुरुषांना बाहेरची कामं करावी लागायची, कमावून आणावे लागायचे तर महिला घर सांभाळायच्या. हळूहळू आपण आपल्या मुलींना स्वतंत्रपणे कसे जगायचे आणि सर्व क्षेत्रात कसे काम करायचे हे शिकवले, पण मुलांनी घरातली कामं कशी करायची आणि पत्नीला कसा हातभार लावायचा, हे आपण आपल्या मुलांच्या मनात बिंबवले नाही. महिलांसाठी ही वेळ आणखीनच अवघड झाली आहे, कारण त्यांना घरातले आणि बाहेरचेही काम करायचे आहे. सर्व ठिकाणी ताळमेळ साधत पुढे जायचे आहे.

आभा दमानी सांगतात की, मॅन्युफॅक्चरिंग प्लांट्ससाठी आम्हाला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्या अनेक प्रकारचे सामाजिक उत्तरदायित्वाचे उपक्रमही राबवतात, जसे की, रुग्णालयात मशीन दान करणे इ. यासाठी त्यांना मुख्यमंत्र्याकडून अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. हा प्लांट अंकलेश्वरमध्ये असल्यामुळे तेथील मुलींच्या शिक्षणासाठी आणि रोजगारासाठी त्या अनेक उपक्रम राबवत आहेत.

आभा सांगतात की, जीवनात अनेक आव्हाने येतात, पण नेहमीच कुठून ना कुठून मदत मिळतेच, म्हणजेच जेव्हा तुम्ही प्रयत्न करता तेव्हा तुम्हाला मार्ग सापडतात. आपल्याला फक्त पुढे जात राहण्याची गरज असते. तुमच्यातील जिद्द पाहून तुम्हाला मदत करणारे अनेक लोक भेटतात.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें