*  गरिमा पंकज

आरशाचा उपयोग फक्त चेहरा पाहण्यासाठीच होत नाही तर घराच्या सजावटीसाठीही होतो. इंटिरियर डेकोरेशन म्हणजे अंतर्गत सजावटीत त्याचा मोठया प्रमाणावर वापर होऊ लागल्याने आता अंतर्गत सजावटीतील महत्त्वाचा घटक म्हणून आरशाकडे पाहिले जाऊ लागले आहे.

आरसा योग्य पद्धतीने लावल्यास छोटी जागाही मोठी दिसू लागते. भकास जागेत चैतन्य निर्माण होते आणि काळोख्या जागेत प्रकाशाचा आभास होतो. म्हणजेच सजावटीत आरशाचा केलेला वापर त्या जागेचा संपूर्ण चेहरामोहराच बदलून टाकतो.

आरशाची संकल्पना

प्राचीन काळापासूनच आरशाचा उपयोग घर आणि महालांना सजविण्यासाठी होत आला आहे. आता पुन्हा एकदा सजावटीत आरशाच्या संकल्पनेचा वापर झपाटयाने वाढत आहे. त्यामुळेच आरसा केवळ ड्रेसिंग टेबलचाच एक भाग राहिलेला नाही तर घराच्या सजावटीतीलही एक महत्त्वपूर्ण घटक झाला आहे. घर आणि कार्यालयांतील अंतर्गत सजावटीत आर्ट पीस म्हणून आरशाचा वापर केला जात आहे.

घराच्या आतच नाही तर घराबाहेर बाग, अंगण, गच्चीवरही आरशाचा वापर होऊ लागला आहे. कोणती जागा सजवायची आहे, ते पाहून त्यानुसार वेगवेगळया आकार आणि प्रकारातील आरशाची निवड केली जाते.

प्रे इंक स्टुडिओचे आर्किटेक्ट म्हणजे वास्तूरचनाकार सर्वेश चड्ढा यांनी मिरर इफेक्टबाबत माहिती दिली :

भिंतीवर : आरसा भिंतीवर लावल्यास तुमची खोली मोठी दिसेल, सोबतच ती अधिक आकर्षक वाटू लागेल. खोलीत नेहमीच मोठा आरसा लावा. त्याची उंची भिंतीइतकी असायला हवी. दरवाजासमोर असलेल्या भिंतीवरच आरसा लावा, जेणेकरून बाहेरचे संपूर्ण प्रतिबिंब आत दिसेल.

सोफ्यावर : सोफ्याच्यावर जी मोकळी जागा असते तिथे फ्रेम बनवून त्यात छोटे, मोठे आरसे लावले जातात. तुम्ही ही फ्रेम इतर एखाद्या मोकळया भिंतीवरही लावू शकता. भिंतीची लांबी, रुंदी, फर्निचर आणि पडद्याच्या रंगानुसार फ्रेमचा आकार ठरतो.

स्वयंपाकघर : स्वयंपाकघरातही आरशाचा वापर होऊ लागला आहे. त्याचा वापर तुम्ही कपाटावर किंवा फ्रीजवरही शो पीस म्हणून करू शकता.

सर्वसाधारणपणे स्वयंपाकघरात खिडकीच्या अगदी खाली सिंक लावले जाते, पण जर खिडकी नसेल तर सिंकच्यावर आरसा लावून तुम्ही खिडकीची उणीव भरून काढू शकता. आरशाचा प्रयोग केल्यामुळे स्वयंपाकघरात अधिकचा प्रकाश असल्यासारखा भास होईल. याशिवाय मिरर टाईल्स स्वयंपाकघरातील सौंदर्यात भर घालू शकतात.

दिवाणखाना : सुंदर फ्रेममध्ये लावलेला आरसा लिविंग रूम म्हणजेच दिवाणखाण्याची शोभा वाढवितो. आरशासमोर एखादी सुंदर कलाकृती, चित्ररूपी देखावा असेल तर त्याचे प्रतिबिंब आरशात दिसते आणि त्यामुळे खोली अधिक मोठी आणि सुंदर दिसू लागते. खिडकीसमोर लावलेला आरसा प्रकाशाला प्रतिबिंबित करून खोलीत जिवंतपणा आणतो.

खिडकीजवळ : खिडकीच्याजवळ आरसा लावल्यास खोलीतील नैसर्गिक प्रकाशात वाढ होईल. खिडकीच्या जवळ किती जागा उपलब्ध आहे ते पाहून त्यानुसारच आरशाची निवड करा. आरसा जितका मोठा असेल तितकी खोली अधिक उजळून निघेल.

बगिच्यात : अनेक घरात स्वत:चा बगिचा किंवा मग टेरेसवर बगिचा असतो. बगिच्यात केलेला आरशाचा वापर तुमच्या घराच्या सजावटीला एक वेगळा आयाम देईल. यात तुमच्या बगिच्यातील हिरवळ आणि रंगीबेरंगी फुलांचे प्रतिबिंब पहायला मिळेल. पतंगाच्या आकाराचे आरसे लावल्यास हे आरसे आणि रात्रीचे निळे आकाश अशी रंगसंगती खूपच आकर्षक दिसेल.

पायऱ्यांवर : चित्ररूपी देखावा किंवा शोपीस ऐवजी पायऱ्यांवर आरसा लावता येईल. तुम्ही वेगवेगळया आकाराच्या आरशांचा कोलाज करू शकता.

कॉरिडॉरमध्ये : जर कॉरिडॉर छोटा असेल तर तिथेही आरसे लावा. यामुळे तो मोठा आणि चमकदार दिसेल.

पलंगाच्या बाजूचे टेबल : पलंगाच्या बाजूच्या टेबलामागे छोटा आरसा लावा. त्याच्या पुढे लॅम्प शेड किंवा फुलदाणी ठेवा. याचे आरशात पडणारे प्रतिबिंब बेडरूमला अधिक आकर्षक बनवेल.

वॉर्डरोब पॅनल्स : वॉर्डरोब पॅनल्सना मिरर पॅनल्सने बदलून टाका. यामुळे तुमची खोली मोठी आणि उजळदार दिसेल. शिवाय लाकडाच्या तुलनेत तुमच्या वॉर्डरोबचे पॅनल्स वजनानेही कमी असतील. ड्रेसिंग एरिया म्हणूनही तुम्ही याचा वापर करू शकता.

बाथरूम : बाथरूममध्येही आरसा लावा. यामुळे तो मोठा आणि अधिक प्रकाशमान दिसेल.

प्रवेशद्वार : प्रवेशद्वारावर लावलेला आरसा खूपच उपयोगी पडेल. तुम्ही आणि तुमचे पाहुणे घरात पाऊल टाकण्यापूर्वी स्वत:वर एक नजर टाकू शकतील.

निवड कशी कराल?

खोलीचा रंग आणि तेथील फर्निचरच्या रंगानुसारच आरशाची फ्रेम निवडा. अंतर्गत सजावटीत मेटल किंवा लाकडाच्या फ्रेमचा वापर अधिक केला जातो. घराला क्लासिक लुक द्यायचा असेल तर गोल्ड प्लेटेट फ्रेम निवडा. तर मॉडर्न लुकसाठी तुम्ही मेटॅलिकची फ्रेम निवडू शकता. आरशावर काढण्यात आलेल्या चित्रांना तुम्ही वॉल आर्टच्या रुपातही लावू शकता.

बाथरूममध्ये नेहमीच मोठा आरसा लावा. तो ७-८ एमएमचा असायला हवा. आरसा जितका मोठा तितकाच लुक चांगला मिळेल. आरशाच्या मागच्या बाजूला गडद रंग लावला असेल तर अतिउत्तम. यामुळे आरशातील  तुमची प्रतिमा अधिक ठळक आणि चांगली दिसेल.

घराला नेहमी सिमिट्रीने सजवा. यामुळे तुमचे घर सुंदर दिसेल, सोबतच आरसे अधिक आकर्षक दिसतील.

कोणत्या आरशांना आहे जास्त मागणी?

ट्रान्सपलंट म्हणजे आरपार दिसेल असे पारदर्शक आरसे, विविध रंगात येणारे लेकर्ड आरसे, रंगीत किंवा ठिपके असलेले आरसे, लुकिंग मिरर म्हणजे चेहरा पाहता येईल असे आरसे इत्यादी प्रकारच्या आरशांना सध्या विशेष मागणी आहे. ते वेगवेगळया आकार आणि प्रकारात उपलब्ध आहेत. गोल, चौकोनी, लांब, रुंद, लहान, मोठे इत्यादी. तुम्ही तुमची गरज आणि आवडीनुसार आरशाची निवड करू शकता.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...