* लीना खत्री

शीला एक गृहिणी आहे. तिची तक्रार ही आहे की ती कधीही फ्री नसते. तिची कामवाली बाई सकाळी ९ वाजता येते, पण ९ वाजेपर्यंत ना तिला डस्टिंग करून ठेवणे जमतं ना ओटा क्लीन करून भांडी घासण्यासाठी ठेवायला जमतं. यामुळे कामवालीसुद्धा वैतागून जाते. पण कामवाली फारच वेगात तिचे काम करून निघून जातेही. संपूर्ण दिवस घराच्या कामात व्यस्त असलेल्या शीलाला कळतच नाही की तिचा वेळ नक्की जातो तरी कुठे?

शीलासारख्या अशा अनेक गृहिणी असतील ज्यांना हीच समस्या सतावत असते. पण घरी राहून घरातली कामे उरकणे फार कठीण काम नाही. फक्त गरज आहे ती थोडयाशा वर्क मॅनेजमेंटची.

सोशल साइट्सवर बिझी राहू नका

जेव्हा शीलाने आपल्या पतिला ही गोष्ट सांगितली, तेव्हा तो तिला म्हणाला की सकाळीसकाळी तुझा बराच वेळ मोबाइलवर वाया जातो. शीलाला आपल्या पतिचे म्हणणे पटले. खरं तर, शीलाला सवय होती की सकाळी सकाळी सोशल साइट्सवर लाइक्स, कमेंट्स पाहत बसायचे आणि त्यांना रिप्लाय करण्यात ती इतकी रमून जायची की तिला वेळ काळाचे भानच उरायचे नाही. जेव्हा शीलाला आपली चूक कळली, तेव्हा तिने स्वत:मध्ये सुधारणा केली आणि सकाळऐवजी सर्व कामं पूर्ण झाल्यावरच ती सोशल मिडियावर अॅक्टिव्ह राहू लागली. आता तिची सर्व कामे वेळेत होऊ लागली आणि तिला पूर्ण दिवस फ्री मिळू लागला आहे.

टाइमटेबलने होईल काम

मीनलच्या घरी कामवाली नाहीए, पण तरीही तिची सर्व कामे दुपारी १२ च्या आत पूर्ण होतात. कारण तिने प्रत्येक कामासाठी वेळ राखून ठेवला आहे. किती वेळात कोणते काम करायचे हे ती आधीच ठरवून ठेवते. टाइमटेबलनुसार केलेले काम हे नेहमी वेळेत पूर्ण होते आणि संपूर्ण दिवस आपल्याला फ्री मिळून स्वत:साठी भरपूर वेळ देता येतो.

सकाळी लवकर उठा

बऱ्याच हाऊसवाइफना उशिरा उठण्याची सवय असते, नाहीतर मुले शाळेत गेल्यावर त्या आळसात पडून राहतात. यामुळे कधी कधी गाढ झोप लागते आणि मग खूप उशीर होतो. सकाळी कामे जर उशिरा सुरू झाली तर मग पुढचा संपूर्ण दिवस गोंधळ आणि तणावाचा जातो आणि मग स्वत:साठी वेळ असा मिळतच नाही. त्यामुळे लवकर उठायची सवय करून घ्या आणि एकदा उठल्यावर पुन्हा झोपला नाहीत तर मग तुमच्यापाशी वेळच वेळ असेल.

एक्स्ट्रा कामांसाठी वेगळा वेळ

दररोजच्या कामांव्यतिरिक्त काही अशीही कामे असतात, जी गृहिणींसाठी आव्हानात्मक असतात. बीनाला ही सवय आहे की ती लवकर उठून सर्व कामे आटपून घेते. मुले शाळेतून घरी येण्याआधी जो वेळ मिळतो त्यात ती एक्स्ट्रा कामे जसे वॉर्डरोबची साफसफाई, कपडयांना इस्त्री करणे, हिशोब तपासणे अशी कामे उरकून घेते. यामुळे अतिरिक्त प्रेशर न येता तिची कामे पूर्ण होतात. आणि तिचे घरही अस्ताव्यस्त दिसत नाही. मग कोणत्याही वेळी पाहुणे आले तरी तिचे घर एकदम अपटुडेट असते.

काम सोपवायला शिका

घर काही तुमच्या एकटीचेच नाही. सर्व कामे स्वत:वर ओढवून घेऊ नका. आपला पती आणि मुले यांच्यावर थोडी थोडी कामे सोपवा. जसे डस्टिंग किंवा बाहेरून काही सामान आणणे. सुट्टीच्या दिवशी हाउसवाइफवर अतिरिक्त कामाचे प्रेशर असते. अशावेळी जर सर्वांची मदत घेतली तर न थकता सर्व कामे वेळेत पूर्ण होतात आणि कुटुंबासोबत मनमुराद सुट्टीचा आनंदही घेता येतो.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...