* गरिमा पंकज
सुंदर गुलाबी ओठांवर कितीतरी कविता केलेल्या आहेत. कोणत्याही महिलेच्या किंवा मुलीच्या पर्समध्ये मेकअपचे अन्य साहित्य असेल किंवा नसेलही, पण लिपस्टिक किंवा लिपग्लॉस असतोच. मेकअपमध्ये लिपस्टिकचे काय महत्त्व आहे, हे फक्त महिलांनाच माहीत असते. लिपस्टिकच्या रंगापासून ते त्याच्या विविध प्रकारांबद्दल कोणतीही महिला तडजोड करू इच्छित नाही.
आजकाल बाजारात लिपस्टिकचे असंख्य रंग आणि प्रकार उपलब्ध आहेत, त्यामुळे आपल्या गरजेनुसार निवड करणे थोडे कठीण होऊ शकते. याशिवाय लिपस्टिकशी संबंधित अशा अनेक गोष्टी आहेत ज्या प्रत्येक महिलेने जाणून घेणे गरजेचे आहे.
या संदर्भात तज्ज्ञ, सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट गुंजन अघेरा पटेल यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली. त्यानुसार, लिपस्टिकचे अनेक प्रकार आहेत :
मॅट लिपस्टिक
ओठांना कोरडा लुक देण्यासह तो दीर्घकाळ टिकवण्यासाठी मॅट लिपस्टिक चांगली आहे. जर तुमच्या ओठांना भेगा पडल्या असतील तर ही लिपस्टिक लावल्याने लुक बिघडू शकतो. ती लावण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ती दीर्घकाळ टिकते, त्यामुळे तुम्ही प्रदीर्घ बैठकीत किंवा पार्टीत ती लावू शकता.
क्रीम लिपस्टिक
याचा लुकही मॅट लिपस्टिकसारखा दिसतो, पण ती लावल्यानंतर ओठ कोरडे दिसत नाहीत, कारण क्रीम लिपस्टिकमध्ये मॅटपेक्षा जास्त मॉइश्चरायझर असते, ज्यामुळे ओठांना मुलायम लुक मिळतो. ही देखील अनेकदा पसरते, त्यामुळेच तुम्ही ती फक्त अशा ठिकाणी लावा जिथे खाण्यापिण्याचे काम कमी असेल किंवा तुम्ही पुन्हा लिपस्टिक लावू शकता. ही लावण्यापूर्वी, ओठांची बाह्यरेषा अखून घ्या.
लिप ग्लॉस
ओठ चमकदार दिसण्यासाठी लिपग्लॉस लावला जातो. तो लिपस्टिकवर लावल्यास लिपस्टिकचा रंगही चमकदार दिसतो.
लिप टिंट
जर तुम्ही लिपस्टिक लावण्याच्या मूडमध्ये नसाल आणि लिपस्टिकसारखा लुक हवा असेल तर लिप टिंट ही गरज पूर्ण करू शकते. हे आजकाल खूपच ट्रेंडी आहे आणि तुमच्या ओठांना नैसर्गिक लुक देते.
लिक्विड लिपस्टिक
लिक्विड लिपस्टिक दीर्घकाळ टिकणारी असते. यामुळे ओठांना मॅट फिनिशही मिळते आणि ते जास्त काळ टिकते.
शियर लिपस्टिक
जर तुम्हाला नैसर्गिक लुक हवा असेल तर शियर लिपस्टिक हा उत्तम पर्याय आहे. अशी लिपस्टिक लावण्यापूर्वी, ओठांवर कन्सिलर बेस बनवणे किंवा हलका बाम लावून ओठांना पोषण देणे योग्य ठरते. असे केल्यास ही लिपस्टिक तुमच्यावर जास्त शोभून दिसेल.
लिप क्रेयॉन
क्रेयॉन लिपस्टिक आकाराने थोडी मोठी असते. ती ओठांवर बामसारखी लावता येते. या प्रकारची लिपस्टिक भेगा पडलेल्या आणि कोरडया ओठांसाठी चांगली आहे.
टिंटेड लिप बाम
टिंटेड लिपस्टिकप्रमाणेच टिंटेड लिप बामही खूप ट्रेंडमध्ये आहे. यामुळे ओठ आरामदायी राहतात. हा तुम्ही कार्यालय किंवा महाविद्यालयात कुठेही घेऊन जाऊ शकतात.
लिपस्टिक दीर्घकाळ कशी टिकवून ठेवायची?
* लांब कुठेतरी जायचे असल्यास मॅट लिपस्टिक लावा. ती दीर्घकाळ टिकते आणि लवकर खराबही होत नाही.
* क्रीम लिपस्टिक लावल्यानंतर, ट्रान्सलूसेंट पावडर नक्की लावा. ती लिपस्टिक सेट करेल आणि त्यामुळे लिपस्टिक टिकेल.
* लिपस्टिक लावून पार्टी किंवा सोहळ्याला गेला असाल तर तेलकट पदार्थ खाणे टाळा, अन्यथा लिपस्टिक खराब होऊ शकते. लिपस्टिक लावताना ती दातांना लागणार नाही याची काळजी घ्या, अन्यथा ते लाजिरवाणे होऊ शकते.
* लिपस्टिक लावल्यानंतर अनेक महिलांचे ओठ काळे पडतात. हे टाळण्यासाठी लिपस्टिक लावण्यापूर्वी लिप कन्सिलर लावा, यामुळे रंगही उठावदार दिसेल.
लिपस्टिकशी संबंधित मूलभूत गोष्टी
* लिपस्टिक दातांना लागू देऊ नका.
* जर लिपस्टिक पसरली असेल तर तुम्ही ती कन्सिलरने लपवू शकता.
* लिपस्टिक गडद असेल तर तुम्ही ती कन्सिलरने कमी करू शकता.
* ओठ अधिक उठावदार करण्यासाठी, ओठांचा कडांवर कन्सिलर लावा.
* लिपस्टिक शेडचा एखादा आयशॅडो तुटला असेल तर तुम्ही तो टिंटमध्ये मिसळून लिपस्टिक म्हणून वापरू शकता.
कोणत्या त्वचेसाठी कोणती लिपस्टिक?
लिपस्टिकचा रंग नेहमी त्वचेच्या रंगानुसार निवडला पाहिजे. बऱ्याच महिलांना माहीत नसते की, लिपस्टिकचा कोणता रंग त्यांच्या त्वचेला शोभेल. याकडे लक्ष न देता लिपस्टिक लावल्याने लुक खराब होऊ शकतो. त्यामुळे लिपस्टिकची निवड नेहमी त्वचेच्या रंगानुसारच करावी.
* हलका गुलाबी, न्यूड गुलाबी आणि लाल रंग यासारख्या उजळ रंगाच्या लिपस्टिक नेहमी गोऱ्या त्वचेवर शोभतात.
* जर त्वचेचा रंग सावळा असेल तर तुम्ही चेरी, मिडीयम तपकिरी आणि मरून रंग लावून पाहू शकता. या सर्व शेड्स तुम्हाला शोभतील. याशिवाय तुम्ही न्यूड शेड्सही लावून पाहू शकता.
लिपस्टिक खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवा
लिपस्टिकच्या बाबतीत, प्रत्येक महिला आणि मुलीला लिपस्टीकशी संबंधित छोटी-मोठी सर्व माहिती असणे आवश्यक आहे. कुठलीही लिपस्टिक विकत घेऊन लावल्याने तुमच्या लुकवर वाईट परिणाम होऊ शकतो.
* तुम्ही खरेदी करत असलेली लिपस्टिक दीर्घकाळ टिकणारी हवी.
* लिपस्टिकचा रंग नेहमी तुमच्या त्वचेच्या रंगाला पूरक असावा.
* तुमच्या त्वचेचा प्रकार लक्षात घेऊनच लिपस्टिक निवडा.
* ओठ कोरडे आणि रखरखीत असतील तर क्रीम लिपस्टिक वापरा, ओठ तेलकट असतील तरच मॅट लिपस्टिक निवडा.
* जर तुम्ही डीप शेड लिपस्टिक वापरत असाल तर तुमचे ओठ लहान दिसतील आणि जर गडद शेडची लिपस्टिक वापरत असाल तर तुमचे ओठ मोठे दिसतील.
* लिपस्टिक घेण्यापूर्वी एकदा ती नक्की लावून पाहा.
कोणती लिपस्टिक खरेदी करावी?
अशा अनेक महिला आहेत ज्यांना खिशाला परवडणारी लिपस्टिक खरेदी करणे आवडते, तर अनेक महिलांना ब्रँडेड आणि महागड्या लिपस्टिक खरेदी करणे आवडते. मात्र, लिपस्टिक कोणतीही असो, ती वापरण्याचे तंत्र चांगले असले पाहिजे. महागडया लिपस्टिकबद्दल बोलायचे तर भारतात सर्वात महागडी लिपस्टिक ब्रँड टॉम फोर्ड, मॅक, बॉबी ब्राउन, फेंटी ब्युटी, हूड ब्युटी, केट वॉन डी, गुच्ची, शेरलोट टिलबरी, पॅट मॅकग्राथ, डायर, नताशा मूर इत्यादी आहेत, ज्यांचा दर्जा सर्वोत्कृष्ट आहे. पण याची किंमत २-३ हजार रुपयांपासून सुरू होऊन ८-१० हजार रुपयांपर्यंत जाऊ शकते. अनेक पॉकेट फ्रेंडली ब्रँड्स आहेत ज्यांच्या लिपस्टिक चांगल्या दर्जाच्या आहेत आणि त्या महिलांमध्ये लोकप्रियही आहेत. जसे की, लॉरियन मेबेलिन, फेसस कॅनडा, लॅक्मे, शुगर कॉस्मेटिक्स, इन्साइट, प्लम, एली १८ इत्यादी.