मान्सून स्पेशल : मान्सून आणि अॅलर्जी

* डॉ. पी. के मल्होत्रा

पावसाळयाच्या दिवसांत थोडे जरी बेफिकीर राहिलात, तरी तुम्ही अॅलर्जी आणि इन्फेक्शनचे शिकार होऊ शकता. पावसाळा सुरू होताच, अनेक आजार आपल्यावर हल्ला करतात. त्याचबरोबर, त्वचा आणि डोळयांसंबंधी विकार डोके वर काढतात.

स्किन इन्फेक्शन

पाऊस सुरू होताच सर्वप्रथम त्वचेवर त्याचा विपरित परिणाम होतो. या काळात वातावरणात आर्द्रता अर्थात ह्युमिडिटी जास्त असल्यामुळे बॅक्टेरिया, वायरस, फंगस वेगाने वाढू लागतात आणि हे त्वचेच्या संपर्कात आल्यास त्वचेला इन्फेक्शन होतं. अर्थात, या दिवसांत त्वचेला सर्वाधिक संक्रमणाची भीती कोणापासून असेल, तर ते आहे फंगस. पावसाळयाच्या दिवसांत सर्वात जास्त फंगस म्हणजेच शेवाळामुळे त्वचेला आजाराचं संक्रमण होते. अशा वेळी अनेक प्रकारचे स्किन डिसीझ होण्याची शक्यता असते.

रेड पॅच किंवा लाल चट्टे

फंगल इन्फेक्शनमुळे त्वचेला खासकरून काख, पोट आणि जांघांचे सांधे, तसेच स्तनांखाली गोल, लाल रंगाचे पपडी निघणारे चट्टे दिसू लागतात. त्यांना खूप खाज येते.

या समस्येपासून वाचण्यासाठी काख, ग्रोइन व शरीराच्या ज्या भागांमध्ये सांध्यांचा जोड आहे, तिथे अँटिफंगल पावडर लावा, जेणेकरून घाम आणि ओलावा एकत्र होणार नाही. वाटल्यास, मेडिकेटेड पावडरचा वापर करा.

हीट रॅशेज

या मोसमात जास्त घाम येतो, त्यामुळे त्वचेची रोमछिद्रं म्हणजेच स्किन पोर्स बंद होतात. त्यामुळे त्वचेवर लाल फोडया म्हणजेच घामोळं येतं. त्याला खूप खाज तर येते व जळजळही होते.

अशा वेळी प्रिकली हीट पावडर लावा, सैल आणि सुती कपडे वापरा. त्वचेच्या स्वच्छतेबाबत पूर्णपणे काळजी घ्या. घामोळे आलं असेल, तर कॅलामाइन लोशनचा वापर करा. त्यामुळे खाजेपासून आराम मिळेल.

पायांचे इन्फेक्शन

फंगल इन्फेक्शनमुळे पायांच्या बोटांमधील पेरांना संक्रमण होतं. खरं तर या मोसमात उघडया पायांनी ओल्या फरशीवर चालल्यास किंवा जास्त काळ पाण्याच्या संपर्कात राहिल्यास, त्यात असलेले फंगस बोटांना संक्रमित करतात. या संक्रमणामुळे बोटे लाल होऊन सुजतात आणि त्यांना खाज येऊ लागते. या संक्रमणामुळे रुग्णाला चालणंही कठीण होतं. या संक्रमणामुळे अनेकदा अंगठयांची नखं म्हणजेच टो नेल्स आणि इतर बोटांची नखंही संक्रमित होतात. या संक्रमणामुळे नखं खराब तर दिसतातच, शिवाय ती कमजोर होतात.

फूट आणि नेल इन्फेक्शनपासून वाचण्यासाठी ओल्या फरशीवरून उघडया पायांनी चालू नका. पायांना जास्त काळ ओले ठेवू नका. खूप वेळ सॉक्स व बूट घालून राहू नका. कारण त्यामुळे घाम येतो आणि तो तसाच राहातो. त्यामुळे फंगल इन्फेक्शन होतं. या मोसमात सँडल्स आणि फ्लोटर्सचाच वापर करा. नखं वेळोवेळी कापत जा आणि त्यांच्या स्वच्छतेचीही काळजी घ्या. सुती मोजे वापरा.

साइट संक्रमण (रांजणवाडी)

पावसाळयात डोळयांना सर्वात जास्त त्रास साइट संक्रमणाचा होतो. या संक्रमणामुळे पापण्यांवर एक प्रकारची गाठ होते. त्यामुळे डोळयांना खूप वेदना होतात. हे संक्रमण बॅक्टेरियांचे डोळयांना संक्रमण झाल्यामुळे होते. गरम पाण्यात कपडा बुडवून शेकल्याने, तसेच २-३ तासांनी सतत डोळयांची सफाई केल्याने रुग्णाला आराम मिळतो.

याबरोबरच या मोसमात डोळे लाल होणं, त्यांची जळजळ, टोचल्यासारखे वाटणं आणि खाज येणं हा त्रासही नेहमीच उद्भवतो.

अॅथलीट फूट

हा आजार जास्त काळ दूषित पाण्यात राहाणाऱ्यांना होतो. या संक्रमणाची सुरुवात अंगठयाने होते. येथील त्वचा सफेद किंवा हिरवट होते. त्यात खाज येऊ लागते. अनेकदा या त्वचेतून दुर्गंधीयुक्त स्त्राव निघू लागतो.

अशा संक्रमणापासून संरक्षण करण्यासाठी पाण्यातून बाहेर आल्यानंतर पाय गरम पाण्याने साबण लावून स्वच्छ धुवा. त्यानंतर ते चांगल्याप्रकारे कोरडे करा.

आय इन्फेक्शन

या दिवसांत हवेतील परागकण, धुलीकण व इतर अॅलर्जिक गोष्टींमुळे डोळयांना इन्फेक्शन होऊन ते लाल होतात. याला अॅलर्जिक कंजक्टिवायटिस म्हणतात. यामुळे डोळयांना सूज येते. डोळयांतून पाणी येत नसले, तरी त्यांना खूप खाज येते. या त्रासापासून वाचण्यासाठी अॅलर्जिक गोष्टींपासून स्वत:चं संरक्षण करा. थोडया-थोडया वेळाने डोळयांत आयड्रॉप टाका.

अस्थमा

पावसाळी हवेत परागकण व फंगससारखे अॅलर्जन असल्यामुळे अस्थमाचा त्रास वाढतो. पावसाळयात अस्थमा बळावण्याची अनेक कारणं आहेत :

विजेच्या कडकडाटासह पाऊस पडल्यास, या मोसमात रुग्णाला अस्थमाचा अॅटॅक येतो. या मोसमात वेगाने वारे वाहात असल्यामुळे मोठया प्रमाणात फुलांतील परागकण बाहेर पडून हवेत मिसळतात. ते श्वासासोबत रुग्णाच्या शरीरात प्रवेश करतात. परिणामी, रुग्णाचा त्रास आणखी वाढतो.

* या मोसमात ह्युमिडिटी म्हणजेच आर्द्रता वाढल्यामुळे फंगल स्पोर्स किंवा मोल्ड्स वेगाने वाढतात. हे फंगस किंवा मोल्ड्स दम्याच्या रुग्णासाठी खूप स्ट्राँग अॅलर्जन असतात. अशा वेळी वातावरणात यांचं प्रमाण वाढणं अस्थमा रुग्णांसाठी त्रासाला आमंत्रण देण्यासारखं असतं. याच कारणामुळे या मोसमात दम्याचे सर्वाधिक अॅटॅक येतात. पावसामुळे हवेत सल्फरडायऑक्साइड आणि नायट्रोजन ऑक्साइडचं प्रमाण वाढतं. परिणामी, वायुप्रदूषणात वाढ होते. हे सल्फरडायऑक्साइड आणि नायट्रोजन ऑक्साइड दम्याच्या रुग्णांवर सरळ हल्ला करतात. त्यामुळे त्यांचा त्रास वाढतो. पावसाळयात गाडयांमुळे होणारे वायुप्रदूषण सहजपणे नष्ट होत नाही. त्यामुळे अस्थमाच्या अॅटॅकचा धोका वाढतो.

* पावसाळयात कुत्रा, मांजर यांसारखे प्राणी घरातच असतात. पावसामुळे त्यांचं बाहेर जाणं कमी होतं. परिणामी, त्यांच्या केसांतील कोंडयाचं प्रमाण वाढतं. हा कोंडा अस्थमा रुग्णांसाठी त्रासदायक ठरतो.

* पावसाळयात व्हायरल इन्फेक्शनमध्ये वाढ होते. त्यामुळे दम्याची लक्षणं वाढतात.

या मोसमात अस्थमापासून संरक्षण करण्यासाठी खालील काळजी घ्या :

* या काळात नियमितपणे दम्याचं औषध घेत राहा. ज्यांना गंभीर प्रकारचा अस्थमा आहे, त्यांनी इन्हेलरद्वारे घेतलं जाणारं औषध घेत राहा. जेणेकरून, त्यांच्या वायुनलिकांमध्ये सूज येणार नाही.

* आर्द्रता म्हणजेच ह्युमिडिटी आणि ओलसर जागांना वेळीच कोरडे व हवेशीर बनवा.

* गरज वाटल्यास एअर कंडिशनचा वापर करा.

* नियमितपणे बाथरूमची सफाई करा. सफाईसाठी क्लीनिंग उत्पादनांचा वापर करा.

* वाफेला बाहेर काढण्यासाठी एक्झस्ट फॅनचा वापर करा.

* या दिवसांत इनडोअर प्लाण्ट्सना बेडरूमच्या बाहेर ठेवा.

* बाहेरील स्रोत उदा. ओली पानं, बागेतील गवत, कचरा यापासून दूर राहा. कारण तिथे शेवाळ असण्याची शक्यता असते.

* फंगसला नष्ट करण्यासाठी ब्लीच आणि डिटर्जंट असलेल्या क्लीनिंग सोल्युशनचा वापर करा.

* ज्या वेळी सर्वात जास्त परागकण हवेत पसरलेले असतील, त्यावेळी सकाळीच बाहेर जाणं टाळा.

* फरच्या उशा आणि बेडचा वापर टाळा.

* आठवडयातून एकदा गरम पाण्याने चादरउशांची कव्हर्स स्वच्छ करा.

* या दिवसांत गालिचा अंथरू नका. जर गालिचा अंथरलेला असेल, तर त्याला साफ करताना मास्कचा वापर अवश्य करा.

* घरात धूळ साचणार नाही, या गोष्टीची काळजी घ्या. ओल्या कपडयाने लँपशेड व खिडक्यांच्या काचांना स्वच्छ ठेवा.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें